Last Updated on 08 Jun 2023 3:56 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई | मान्सूनचीआतुरतेने वाट पाहणाऱ्या सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे.अखेर मान्सूनची प्रतीक्षा संपली आहे.मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे.दरवर्षी 1 जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होतो मात्र यंदा मान्सून सात दिवस उशिराने केरळमध्ये दाखल झाला आहे.
मान्सून केरळात दाखल झाल्याची माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ के.एस.होसलीकर यांनी दिली. यासंदर्भात त्यांनी ट्विट करत माहिती दिली. आज 8 जून रोजी मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाले. पुढील 48 तासांत बंगालचा उपसागर आणि केरळच्या बऱ्याचशा भागात मान्सून पोहचणार आहे. मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नैऋत्य मोसमी पावसाने आज केरळमध्ये प्रवेश केला आहे. मान्सूनची वाटचाल दक्षिण अरबी समुद्र आणि मध्य अरबी समुद्र आणि लक्षद्वीप भागात सुरु आहे. केरळ, दक्षिण तामिळनाडू, कोमोरिन भाग, मन्नारचे आखातात मान्सून दाखल झाला आहे.
मान्सून आज केरळमध्ये दाखल झाला असून तो लवकरच महाराष्ट्रात दाखल होईल.मान्सून तळकोकणात 16 जून किंवा त्यानंतरच दाखल होईल,असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.पण, त्याबाबत हवामानशास्त्र विभागाने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.मान्सून महाराष्ट्रात दरवर्षी 7 जूनच्या दरम्यान दाखल झाला आहे.मात्र महाराष्ट्रात मृग नक्षत्राला दाखल होणाऱ्या मान्सूनचे समीकरण यावेळी बदलेले आहे.मान्सून आज दाखल झाल्यामुळे बळीराजाला दिलासा मिळणार आहे.











































































