Last Updated on 03 Oct 2023 4:53 PM by Sanjay Patil/Adhorekhit
दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा; मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबई । दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या शिध्यात आता मैदा आणि पोह्याचा देखील समावेश करण्यात आला आहे.
पूर्वी आनंदाचा शिधा या संचात रवा, चनाडाळ, साखर आणि खाद्यतेल असे 4 जिन्नस होते. मात्र आता यामध्ये दोन जिन्नसांची भर पडली आहे.
राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी अशा 1 कोटी 66 लाख 71 हजार 480 शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा मिळेल.
यामध्ये 1 किलो साखर, 1 लिटर खाद्यतेल तसेच प्रत्येकी अर्धा किलो रवा,चनाडाळ, मैदा आणि पोहे असा शिधा राहील.हा आनंदाचा शिधा 25 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत वितरित करण्यात येईल. यासाठी येणाऱ्या एकूण 630 कोटी 19 लाख इतक्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली.
संक्षिप्त मंत्रिमंडळ निर्णय खालीलप्रमाणे
✅ विदर्भ, मराठवाड्यातील कृषी पंप वीज जोडण्या वेगाने पूर्ण करणार. उच्च दाब वितरण प्रणाली योजनेला मुदतवाढ
✅ अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरीता परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना. दरवर्षी २७ विद्यार्थ्यांना मिळणार लाभ
✅ नागपूरला पाच अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करणार. ४५ पदांनाही मंजुरी
✅ इमारतींच्या पुनर्विकासाला वेग येणार. विरोध करणाऱ्या सदनिका मालकांच्या निष्कासनाबाबत अधिनियमात सुधारणा
✅ गारगोटी येथील तंत्रनिकेतनच्या विनाअनुदानित शाखांना ९० टक्के शासन अनुदान







































































