Last Updated on 30 Jun 2025 2:53 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळात एक आगळीच छटा पाहायला मिळाली. माजी मंत्री आ. सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर हे वारकरी संप्रदायाच्या पारंपरिक वेशभूषेत विधिमंडळात दाखल झाले. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या उपस्थितीने सभागृहात आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले.

वारी ही एक केवळ धार्मिक यात्रा नसून ती एक सामाजिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक चळवळ आहे. जवळपास 724 वर्षांपूर्वी, संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर या दोन थोर संतांनी या वारीची परंपरा सुरू केली. त्या काळात त्यांनी भगवंताची भक्ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, समानता, प्रेम, आणि भक्तीचा संदेश देण्यासाठी ही वारी सुरू केली.
या वेशभूषेतून त्यांनी संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांनी सुरू केलेल्या वारी परंपरेला मानवंदना दिली. केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक आणि आध्यात्मिक चळवळ ठरलेली वारी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग आहे.
“कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी…” या अभंगातून उगम पावलेली भक्ती आणि समानतेची भावना आजच्या आधुनिक राजकारणातही जपली गेल्याचे या घटनेतून दिसून आले.











































































