Last Updated on 24 Aug 2026 8:44 PM by Sanjay Patil/Adhorekhit
आतापर्यंत १२,५८,२४३ शेतकऱ्यांना ₹१०,११५ कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ
मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील ६,३६,०३६ पात्र शेतकऱ्यांना ₹५,०८६ कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थेट ऑनलाइन पद्धतीने वितरित करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या योजनेच्या अंमलबजावणीअंतर्गत आतापर्यंत १२,५८,२४३ शेतकऱ्यांना एकूण ₹१०,११५ कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला आहे. पात्र शेतकऱ्यांना लाभ वितरणाची प्रक्रिया सुरू असून, लाभार्थींची संख्या सातत्याने अद्ययावत होत आहे.आतापर्यंत १३.७० लाख कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील लाभ वितरण ऑनलाइन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्रिमंडळातील सदस्य, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी आणि सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे उपस्थित होते.
दुसऱ्या टप्प्यात विभागनिहाय लाभ
अमरावती विभाग : १ लाख ४५ हजार ८०८ शेतकऱ्यांना ₹१,२०८ कोटींचा लाभ.
नाशिक विभाग : ८४ हजार ८१३ शेतकऱ्यांना ₹७५६ कोटींचा लाभ.
छत्रपती संभाजीनगर विभाग : ३ लाख २ हजार २७३ शेतकऱ्यांना ₹२,२८४ कोटींचा लाभ.
पुणे विभाग : ४९ हजार २२४ शेतकऱ्यांना ₹४१७ कोटींचा लाभ.
नागपूर विभाग : ४४ हजार ८६४ शेतकऱ्यांना ₹३६६ कोटींचा लाभ.
कोकण विभाग : ९ हजार ५४ शेतकऱ्यांना ₹५४ कोटींचा लाभ.
योजनेची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत असून, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या नियंत्रणाखाली या प्रक्रियेचे व्यवस्थापन केले जात आहे.











































































