Last Updated on 30 Apr 2024 9:09 PM by Sanjay Patil/Adhorekhit
शिरूर । चांगलं काम करणाऱ्यांविरोधात सध्या सत्तेचा गैरवापर केला जात आहे, हाती सत्ता असणारे लोक सत्तेचा गैरवापर करत असून राजकीय दृष्ट्या वेगळा विचार असलेल्यां विरोधात गुन्हे दाखल करत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.
शिरूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची आज ओतूर इथं सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. सत्तेचा वापर हा लोकांना अडचणीतून सोडवण्यासाठी करायचा असतो, मात्र, आताचे सत्ताधारी या सत्तेचा वापर लोकांना अडचणी निर्माण करण्यासाठी करत आहेत असा टोलाही पंतप्रधानांनी लगावला.
हेही वाचा – गेल्या ६० वर्षांत काँग्रेसने केवळ घोषणा आणि नारेबाजी केली : नरेंद्र मोदी
पुण्यातल्या सभेत पंतप्रधान मोदी यांनी शरद पवारांचं नाव न घेता, त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती.त्या टीकेलाही आज पवार यांनी प्रत्युत्तर दिलं. पंतप्रधान मोदींचं म्हणणं खरं आहे.आत्मा अस्वस्थ आहे, पण तो स्वत:च्या स्वार्थासाठी नाही,तर शेतकऱ्यांचं दुखणं बघून अस्वस्थ आहे.आज देशात महागाई वाढली आहे, त्यासाठी १०० वेळा अस्वस्थता दाखवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.अडचणी असणाऱ्या लोकांचे दुख: मांडणं आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणं हे माझं कर्तव्य आहे”, असं पवार यावेळी म्हणाले.










































































