Last Updated on 08 Oct 2024 8:48 PM by Sanjay Patil/Adhorekhit
अयोध्या | अयोध्येत राम जन्मभूमी मंदिर परिसरात महाराष्ट्र भक्त सदन उभारण्यासाठी राज्य शासनाने जूनमध्ये जमीन घेतली होती. या जागेवर पर्यावरणपूरक हरित इमारत (environmental friendly green building) बांधण्यात येणार आहे. या इमारतीचे भूमिपूजन आज संपन्न झाले. महाराष्ट्रातील जनतेसाठी हा आनंदाचा क्षण असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी याप्रसंगी सांगितले.
जवळपास 9500 चौरस मीटर क्षेत्रफळावर 12 मजली भव्य भक्त निवास उभे राहणार असून त्या ठिकाणी 650 पर्यटक राहू शकतील. भक्त निवासात एकूण 4 व्हीआयपी कक्ष, 96 खोल्या असून 40 डॉर्मिटरी बांधण्यात येणार आहेत. पुढील तीन वर्षात हे भक्त निवास बांधून पूर्ण करण्यात येणार आहे. भक्तनिवास अयोध्येतील महत्त्वाच्या सर्व स्थळांपासून जवळ आहे. महर्षी वाल्मिकी विमानतळापासून 11.5 किमी, श्रीराम जन्मभूमी मंदिरापासून 7.5 किमी तर अयोध्या रेल्वे जंक्शनपासून 4.5 किलोमीटवर आहे.
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, अयोध्या हनुमान गढीचे महंत राजू दासजी महाराज, अयोध्येचे आमदार वेदप्रकाश गुप्ता, महापौर गिरीशपती त्रिपाठी, सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सचिव (रस्ते) सदाशिव साळुंखे, सचिव (इमारती) संजय दशपुते, मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे, अधीक्षक अभियंता विवेक बडे, मुख्य अभियंता रणजित हांडे, अधीक्षक अभियंता प्रमोद बनगोसावी आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने अयोध्येत महाराष्ट्र भक्त सदन बांधण्याचा मंत्रिमंडळ निर्णय घेतला होता. त्यासाठी यापूर्वी अयोध्येत प्रत्यक्षस्थळी जाऊन जागाही निश्चित केली होती. यासाठी राज्य सरकारने उत्तर प्रदेश सरकारला पहिला टप्प्यासाठी 10 टक्के रक्कम अदा केली होती. तसेच पुढील दोन महिन्यात जागेचा पूर्ण मोबदला अदा करून लवकरात लवकर महाराष्ट्र सदन बांधण्याची कार्यवाही सुरू होईल, असेही रवींद्र चव्हाण यांनी सांगितले होते. त्यानुसार, आता रवींद्र चव्हाण यांच्याच हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला.











































































