Last Updated on 25 Oct 2024 12:20 PM by Sanjay Patil/Adhorekhit
अजित पवारांचा इस्लामपूरमधून जयंत पाटील यांना घेरण्यासाठी मोठा डाव
मुंबई । राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 7 उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील आणि भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी आज अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. अजित पवारांनी इस्लामपूरमधून शरद पवार गटाचे उमेदवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना घेरण्यासाठी मोठा डाव टाकला आहे.
अजित पवार गटाच्या या यादीत विविध मतदारसंघातून नव्या उमेदवारांची नावे समाविष्ट आहेत. इस्लामपूर मतदारसंघातून निशिकांत भोसले-पाटील यांना संधी देण्यात आली आहे, तर तासगावमधून संजयकाका पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अणुशक्ती नगर या क्षेत्रातून सना मलिक, वांद्रे पूर्वीतून झिशान सिद्दीकी, वडगाव शेरीतून सुनील टिंगरे, शिरुरमधून ज्ञानेश्वर कटके आणि लोहा मतदारसंघातून प्रताप पाटील चिखलीकर यांची निवड करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, अजित पवारांनी इस्लामपूरमधून शरद पवार गटाचे उमेदवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना घेरण्यासाठी मोठा डाव टाकला आहे. अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्या विरोधात निशिकांत भोसले-पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे इस्लामपूरची लढतही रंगतदार होणार असल्याचे आता निश्चित झाले आहे.
हेही वाचा – निशिकांत भोसले-पाटील यांचा राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीमध्ये प्रवेश…
राष्ट्रवादी अजित पवार गटाने काही दिवसांपूर्वी पहिली उमेदवारी यादी जाहीर केली होती. या यादीत 38 उमेदवारांच्या नावाचा समावेश होता. त्यानंतर आज सकाळीच अजित पवार गटाकडून दुसरी उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत सात उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाकडून ४५ उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत. त्यापूर्वी अजित पवार गटाकडून मोठी खेळीही करण्यात आली आहे.










































































