Last Updated on 23 Aug 2023 10:58 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पोलिसांच्या समक्ष भोंदू महिलेचा केला पर्दाफाश
कामेरीच्या महिलेसह दोन साथीदारांवर गुन्हे दाखल
![]()
सांगली : विनोद मोहिते
अलौकिक दैवी शक्ती असलेचा दावा करत अंगात देवी आणून फसवणूक करणाऱ्या कामेरी (ता. वाळवा ) येथील भोंदू वृद्ध महिलेला दोन साथीदारांसह अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या समक्ष रंगेहाथ पकडले.
जाधव मावशी नावाने परिचित असणारी 70 वर्षीय भोंदू महिला व तिच्या दोन साथीदारांवर पोलीसांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालणेबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करणेबाबत अधिनियम 2013 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
सावर्डे (ता. तासगांव ) येथील महाराष्ट्र अंधश्रध्दा निमर्लन समितीचे पुर्णवेळ कार्यकर्ते असणाऱ्या भास्कर विठ्ठल सदाकळे यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Adhorekhit : हेही वाचा – महत्वाच्या बातम्या
![]()
याबाबत माहिती अशी ; जाधव मावशी व तिचे दोन साथीदार हे बुवाबाजी करून लोकांची फसवणूक करीत असल्याच्या तक्रारी अंनिसचे राज्य प्रधान सचिव संजय बापूराव बनसोडे यांच्या कडे आल्या होत्या. त्यांनी सदाकळे यांना इस्लामपूर येथे बोलावून घेतले. जाधव मावशी फसवणूक कशी करते याची खात्री करण्यासाठी ११ ऑगस्टला पोलिसांना घेवून अंनिसचे सदाकळे व बनसोडे गेले होते. तेव्हा एक महिला व दोन इसम हे देव्हा-याचे समोर बसून चर्चा करीत होते. काय काम आहे असे विचारले असता बनसोडे यांनी सदाकळे यांचे कडे बोट करून हा माझा भाऊ असून तो वेड्यासारखे करीत आहे. घरात त्याचे लक्ष लागत नाही. विचित्र वागतो असे सांगितले. थोडा वेळ थांबा असे म्हणून जाधव मावशीने अंगात देव संचारलेचा बहाणा केला व ती जोरजोराने ओरडू लागली. “बाळकूला शेतातल्या आंब्याखालच्या गरोदर बाईच्या भुताने झपाटले आहे. त्यामुळे तो असा करत असल्याचे सांगितले.
भूत उतरविण्यासाठी जाधव मावशीने देव्हा-यापुढे असणारे काठीने सदाकळे यांना दोन झटके दिले. ते ओरडायला लागलेनंतर बाळकूला लागत नाही ते भुताला लागत आहे आणि ते भूत ओरडत आहे,असे मावशी सोबत असलेले दोन इसम म्हणत होते. अंगात आलेनंतर मावशीने भूत उरविणेसाठी काही खर्च करावा लागेल जमेल का ? असे विचारले, त्यावेळी सोबत असणारे बनसोडे यांनी होकार दिला. पुढीलवेळी येताना बारा लिंबू,बारा टाचण्या, हळद कुंकू, काळा दोरा व पाच हजार रूपये असे साहित्य भूत उतरविणेकरीता आणा,असे सांगितले व त्यानंतर तिने मंतरून दिलेल्या अंगा-याच्या पाच पुडया व एक मंतरलेले लिंबू असे देवून देव्हा-याजवळ पैसे ठेवा असे सांगितले. त्याप्रमाणे बनसोडे यांनी १०० रुपये देव्हा-यात ठेवले. व सांगितलेला उपाय लवकरात लवकर केला नाही तर तुमच्या जिवीतास धोका होईल किंवा तुमच्या घरातील वडिलधा-याचा मृत्यू होईल अशी भिती घातली. त्यानंतर सर्व जण घरी परतले.
अंनिसच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी पुन्हा सापळा रचून पोलिसांच्या साथीने कामेरी येथे जाधव मावशी कडे धाव घेतली.त्यावेळी मावशीने अजून गूण आलेला नाही काय ? असे विचारले,नाही असे सांगितले त्यावर जाधव मावशीने देव्हा-याजवळ बसवून बघू या असे सांगून देव अंगात संचारलेचा बहाणा केला. पुन्हा दुसरा उपाय करूया असे म्हणून तिने तिचे सोबत असणारे इसमास उद्देशून सर्जेराव असे नांव घेवून अंगारा दे व गणेश यास इलाज कसा करायचा ते लिहून दे असे सांगितले. व देव्हा-याजवळ 100 रुपये ठेवणेस सांगितले. व पुढील आमवस्येला राहिलेले देणे दया. व परत येताना आमचेकडे पाच पुडया व एक लिंबू दिले व पुडीतील सुचनेनुसार उपचार करा असे सांगितले. व यापूर्वी सांगितलेला उपचार लवकरात लवकर नाही केला तर तुमच्या घरातील जिवीतास धोका होईल किंवा तुमच्या घरातील वडिलधा-याचा मृत्यू होईल अशी पुन्हा भिती घातली. त्यानंतर लगेचेच बाहेर आडोश्याला थांबलेल्या पोलिसांनी जाधव मावशीला दोन साथीदारांसह पोलीस ठाण्यात आणले.आणि गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक एन.आर.बाबर तपास करीत आहेत.
निर्भयपणे भोंदुच्या विरोधात तक्रारी द्या
आधुनिक व प्रगत काळातही काही लोक बुवाबाजी करत आहेत,त्यांच्या विरोधात सातत्याने मोहीम सुरू आहे.नागरिकांनी निर्भयपणे अशा भोंदुच्या विरोधात तक्रार दिली पाहिजे.दैवी शक्ती कोणाकडे नसते,देवाच्या धर्माच्या आधारे फसणुक करणाऱ्या पायबंद घालण्यासाठी लोकांनी समितीला सहकार्य करावे.
संजय बनसोडे
राज्य प्रधान सचिव,अं.नि.स. महाराष्ट्र
![]()











































































