Last Updated on 13 Jan 2026 6:09 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई ।
जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती यांच्या निवडणुकांची घोषणा अखेर आज झाली. बारा जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समितीसाठी निवडणुक जाहीर झाली आहे. यासाठी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. तर ७ मतमोजणी फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांसाठी खर्च मर्यादा जाहीर केली आहे.
राज्यात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांसाठी निवडणूक खर्चाची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदांच्या निवडणूक विभागांच्या संख्येनुसार ही खर्च मर्यादा ठरवली असून, त्यानुसार उमेदवारांना ठरावीक रकमेपेक्षा अधिक खर्च करता येणार नाही.
निवडणूक विभागांची संख्या ७१ ते ७५ असलेल्या जिल्हा परिषदांसाठी उमेदवारांना ९ लाख रुपये खर्च मर्यादा लागू राहणार आहे. त्याच जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारांना ६ लाख रुपये खर्च करण्याची मुभा देण्यात आली आहे.
तसेच, ६१ ते ७० निवडणूक विभाग असलेल्या जिल्हा परिषदांसाठी उमेदवारांची खर्च मर्यादा ७ लाख ५० हजार रुपये निश्चित करण्यात आली असून, संबंधित पंचायत समिती निवडणुकांसाठी ही मर्यादा ५ लाख २५ हजार रुपये इतकी असेल.
दरम्यान, ५० ते ६० निवडणूक विभाग असलेल्या जिल्हा परिषदांसाठी उमेदवारांना ६ लाख रुपये खर्च करता येणार असून, त्याअंतर्गत पंचायत समिती निवडणुकांसाठी ४ लाख ५० हजार रुपये खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखणे, अवाजवी खर्चावर नियंत्रण ठेवणे आणि सर्व उमेदवारांना समान संधी मिळावी, या उद्देशाने ही खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. निवडणूक खर्चाची अचूक नोंद ठेवणे उमेदवारांना बंधनकारक राहणार असून, खर्च मर्यादेचे उल्लंघन झाल्यास निवडणूक कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे, असे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
कोणत्या १२ जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार?
लातूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या १२ जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. १२ जिल्हा परिषदेचे आरक्षण ५० टक्क्यांच्या आत आहे.
- कोकण विभाग – रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
- पुणे विभाग – पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर
- संभाजीनगर विभाग – संभाजीनगर, परभणी, धाराशीव व लातूर
जिल्हा परिषदेच्या जागांचा तपशील
एकूण जिल्हा परिषदा- १२
➤ एकूण जागा- ७३१
➤ महिलांसाठी जागा- ३६९
➤ अनुसूचित जातींसाठी जागा- ८३
➤ अनुसूचित जमातींसाठी जागा- २५
➤ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी जागा- १९१
पंचायत समित्यांच्या जागांचा तपशील
➤ एकूण पंचायत समित्या- १२५
➤ एकूण जागा- १,४६२
➤ महिलांसाठी जागा- ७३१
➤ अनुसूचित जातींसाठी जागा- १६६
➤ अनुसूचित जमातींसाठी जागा- ३८
➤ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी जागा- ३४२
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा कार्यक्रम
जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणूक कार्यक्रमाच्या सूचनेची प्रसिद्धी- १६ जानेवारी २०२६
➤ १६ जानेवारी ते २१ जानेवारी दरम्यान उमेदवारांचा अर्ज स्वीकारला जाईल
➤ अर्जांची छाननी २२ जानेवारी रोजी होईल.
➤ उमेदवारी माघारीची अंतिम मुदत – २७ जानेवारी, दुपारी ३ वाजेपर्यंत.
➤ निवडणूक चिन्ह आणि अंतिम उमेदवार यादी – २७ जानेवारी दुपारी ३.३० वाजेनंतर जाहीर केली जाईल.
➤ मतदानाचा दिनांक – ५ फेब्रुवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत असेल.
➤ मत मोजणी आणि निकाल – ७ फेब्रुवारी सकाळी १० वाजल्यापासून.












































































