Last Updated on 18 Jan 2026 4:01 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
आज युवकांच्यासमोर नोकरीं,लग्न आदी काही प्रश्न आहेत. शालेय विद्यार्थी – विद्यार्थिनी, स्पर्धा परीक्षार्थी अल्पशा अपयशाने खचून जात आहेत. युवकांनी विविध व्यसने आणि वाईट संगतीपासून दूर रहात जिद्दीने पुढे यावे,त्यांना निश्चित यश मिळेल, असा विश्वास युवा कीर्तनकार ज्ञानेश्वर माऊली पठाडे (कर्जत) यांनी राजारामनगर येथे व्यक्त केला. त्यांनी “बोले तैसा चाले,त्याची वंदीन पाऊले”या अभंगाचे निरूपण करीत, अनेक चपखल, मिश्किल उदाहरणे देत सुंदर कीर्तन केले.
लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या ४२व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कीर्तन सोहळ्यात ते बोलत होते. आ.जयंतराव पाटील, राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील, महानंदचे माजी अध्यक्ष विनायक पाटील, बाळासाहेब पाटील, शशिकांत पाटील, शहराध्यक्ष शहाजी पाटील, सुस्मिता जाधव, सुनिता देशमाने, शैलजा पाटील, पुष्पलता खरात प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले. स्व.बापूंचा पुतळा परिसर विद्युत रोषणाई व स्वागत कमानीने सजविण्यात आला होता.
ज्ञानेश्वर माहुली पठाडे म्हणाले, तुम्ही कोण आहात, यापेक्षा तुम्ही कोणाच्या संगतीत आहात, यावर तुमचे यश – अपयश अवलंबून राहते. पाऊसाचा तोच थेंब समुद्र,नदी,शिंपला आणि गटार या चार वेग वेगळ्या ठिकाणी पडल्यावर चार वेग वेगळे परिणाम मिळतात. मुलगा-मुलगी असा भेद करू नका. मुलींच्या जन्माचे स्वागत करा. मुलगी ही आई-वडिलांच्या काळजाचा तुकडा ठरते. आज सर्वच क्षेत्रात मुली मोठे यश मिळवित आहेत. यावेळी त्यांनी स्व.बापूंचा आधुनिक भगिरथ करून आ. जयंतराव पाटील,प्रतिकदादा पाटील यांच्या कामाचे कौतुक केले.
त्यांना गायनाचार्य ह.भ.प.उद्धव गुरुजी शिंदे आळंदी, ह.भ.प.धनंजय ओलेकर आळंदी, ह. भ.प. वि पवार अमरावती,मृदूंगाचार्य रोहन महाराज भिसे परभणी,तसेच तुरंबे (ता राधानगरी) येथील ज्ञानोबा तुकोबा अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेच्या ५० टाळकरी विद्यार्थ्यांची यांची सुंदर साथ लाभली. दरम्यान कीर्तनाच्या सुरुवातीला ज्ञानोबा-तुकोबा आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेच्या ५० विद्यार्थ्यांनी युवा कीर्तनकार ओमकार सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर हरिपाठ सादर केला.
आ.जयंतराव पाटील म्हणाले,आपल्या राज्याला संतांची मोठी परंपरा लाभली आहे. त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाजाचे मोठे प्रबोधन केलेले आहे. ज्ञानेश्वर माऊली पठाडे हे राज्यातील तरुण कीर्तन कार आहेत. त्यांनी वयाच्या २८ व्या वर्षापर्यंत साधारण ५ हजार कीर्तने केली आहेत. त्यांनी पन्नास हजार, एक लाख कीर्तनचा टप्पा पार करून समाजाचे मोठया प्रमाणात प्रबोधन करावे. त्यांचा व्यसन मुक्ती,युवा पिढीवर संस्कार, मुलींच्या जन्माचे स्वागत आदी मुद्दावरचा समाज प्रबोधनाचा भर भाविकांना चांगलाच भावतो.
कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक शैलेश पाटील, कार्तिक पाटील, विठ्ठल पाटील, डॉ.सौ.योजना शिंदे पाटील, कार्यकारी संचालक आर.डी.माहुली, सचिव डी.एम.पाटील, भानुदास महाराज कोल्हापूरे, राजेंद्र चव्हाण महाराज, प्रेमनाथ कमलाकर, मनोहर सन्मुख यांनी कीर्तनाचे उत्तम संयोजन केले. वाळवा तालुक्यातील हजारो स्त्री-पुरुष आणि युवा भाविकांनी या कीर्तनाचा लाभ घेतला. याप्रसंगी कारखान्याचे संचालक, तालुक्यातील पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.












































































