Last Updated on 10 Mar 2026 6:16 PM by Sanjay Patil/Adhorekhit
आमदार जयंत पाटील यांचे तालुक्यातील वर्चस्व पुन्हा अधोरेखित
ईश्वरपूर ।
वाळवा पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उदयसिंह प्रतापराव पाटील (शिगाव) यांची, तर उपसभापतीपदी प्रकाश रघुनाथ पाटील (ऐतवडे खुर्द) यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीमुळे वाळवा तालुक्यात आमदार जयंत पाटील यांचे राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा पंचायत समितीवर फडकला आहे.
पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड प्रक्रिया मंगळवारी (ता.१०) ईश्वरपूर येथील पंचायत समिती कार्यालयात पार पडली. सकाळी ११ वाजता सभापतीपदासाठी उदयसिंह पाटील (शिगाव) यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. तर उपसभापतीपदासाठी प्रकाश पाटील (ऐतवडे खुर्द) यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला.

दुपारी सुमारे दोन वाजता प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी दोन्ही पदांसाठी प्राप्त झालेल्या एकमेव अर्जांची घोषणा करत उदयसिंह पाटील यांची सभापतीपदी व प्रकाश पाटील यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार उपस्थित होते.
वाळवा तालुक्यात एकूण २२ पंचायत समिती गण असून या भागात आमदार जयंत पाटील यांचे मजबूत राजकीय वर्चस्व मानले जाते.
पंचायत समितीमध्ये २२ पैकी १४ जागांवर यश मिळवत राष्ट्रवादी काँग्रेस श.प. पक्षाने तालुक्यावर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले होते. सभापती व उपसभापती पदाची निवड बिनविरोध झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक ताकदीची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
नूतन सभापती-उपसभापतींनी केले लोकनेते राजारामबापू पाटील यांना अभिवादन

वाळवा पंचायत समितीचे नूतन सभापती उदयसिंह पाटील (शिगाव), उपसभापती प्रकाश पाटील (ऐतवडे खुर्द) यांनी आपल्या सहकाऱ्यांच्यासह राजारामबापू सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर येऊन लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. स्व.बापूंनी लोकल बोर्डाच्या माध्यमातून राज्यात आदर्शवत काम करत जिल्ह्याच्या विकासाला मोठी चालना दिली आहे. स्व.बापूंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पाच वर्षे काम करु, असा विश्वास नूतन सभापती-उपसभापती यांनी व्यक्त केला. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी हलगी घुमक्याच्या ठेक्यावर फटाक्यांची अतिषबाजी, आणि घोषणांच्या निनादात आपला आंदोत्सव साजरा केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील,जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील,तालुकाध्यक्ष विजयराव पाटील,महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, तालुकाध्यक्षा सुनिता देशमाने, युवक तालुकाध्यक्ष संग्राम जाधव, कार्याध्यक्ष देवराज देशमुख यांनी नूतन सभापती-उपसभापती यांचे कारखाना कार्यस्थळावर स्वागत केले. यावेळी विजयराव पाटील,बाळासाहेब पाटील यांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.
माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी आमच्यावर विश्वास दाखवित ही जबाबदारी आमच्यावर सोपविली आहे. आम्ही कामातून त्यांचा विश्वास सार्थ करून दाखवू. आ.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना बरोबर घेऊन तालुक्याच्या विकासाला चालना देवू,असा विश्वास नूतन पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
राजारामबापू दूध संघांचे उपाध्यक्ष शशिकांत पाटील, माजी उपसभापती सी.व्ही.पाटील, माजी सभापती शुभांगी पाटील, गट नेते प्रकाश पाटील, सदस्य मनोज पाटील, रुपाली सपाटे, सुप्रिया पाटील, वृषाली पाटील, प्रशांत पाटील, स्वाती मदने, पूजा मलगौडी, रेश्मा गुरव, राजारामबापू बँकेचे संचालक अशोक पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.










































































