Last Updated on 02 Jan 2026 8:30 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
कृष्णाकाठचे भाग्यविधाते सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेत पुण्याच्या विजूभाऊ पठारे संघाने विजेतेपद पटकाविले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघाला रोख रक्कम व स्व. जयवंतराव भोसले चषक प्रदान करण्यात आला.
संयोजक डॉ. विश्वास पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील क्रीडामंडळ, नृसिंह गणेश मंडळ आणि येडेमच्छिंद्र ग्रामस्थांच्यावतीने आयोजित या स्पर्धेचे उदघाटन कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त विनायक भोसले आणि राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रतिक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तर समारोपादिवशी य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोेसले प्रमुख उपस्थित होते.
अंतिम सामना अटीतटीचा ठरला. सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. अखेरच्या क्षणी पुण्याच्या विजूभाऊ पठारे संघाने कोल्हापूरच्या छावा क्रीडा मंडळ संघावर चार गुणांनी विजय मिळवत, चषक व २५ हजार रुपयांचे रोख बक्षीस पटकावले. उपविजेत्या छावा क्रीडा मंडळ, कोल्हापूर संघास २० हजार रुपये व चषक, तर तृतीय क्रमांकासाठी साधना क्रीडा मंडळ, कोल्हापूर संघाने शिवशक्ती व्यायाम मंडळ, सांगली संघाचा पराभव करून १५ हजार रुपये व चषक मिळवले.
वैयक्तिक पारितोषिकांमध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून अग्नि मगर (पुणे), उत्कृष्ट चढाईसाठी सर्वेश नेहरे (कोल्हापूर) तर उत्कृष्ट पक्कडसाठी श्रेयस गायकवाड यांची निवड करण्यात आली.
संयोजक डॉ. विश्वास पाटील व डॉ. विकास सत्रे यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. यावेळी राजारामबापू बँकेचे संचालक ॲड. संग्राम पाटील, क्रांतिसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अजित पाटील, राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक शिवाजी पाटील, प्रताप पाटील, माजी सरपंच विश्वास खंडागळे, उपसरपंच अमर पाटील, ग्रामपंचायत सदस्य अशोक हराळे, बाबुराव पाटील, दिलीप पाटील, डॉ. विकास पाटील, प्रा. आनंद पाटील, सचिव संदीप पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सामन्यांचे संयोजन आबासो यादव व जयकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. पंच म्हणून सातारा जिल्हा कबड्डी असोसिएशनचे शशिकांत यादव, तानाजी देसाई, कल्पेश मुळीक व महेश निकम यांनी काम पाहिले.














































































