Last Updated on 12 Nov 2021 8:39 PM by Sanjay Patil/Adhorekhit
5 विकेटने विजय मिळवत अंतिम फेरीत धडक
दुबई |
टी-20 विश्वचषकाच्या दुसऱ्या रोमहर्षक उपांत्य सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर पाच विकेट आणि 6 चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला.डेव्हिड वॉर्नर,मर्क्यूस स्टॉयनीस,मॅथ्यू वेड यांनी केलेल्या तुफानी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने विश्वचषकात पाकला पराभवाची धूळ चारत अंतिम सामन्यात धडक मारली.
दुबईच्या मैदानात आज चौकार, षटकारांचा पाऊस पडला. आता येत्या रविवारी ऑस्ट्रेलिया विजेतेपदासाठी न्यूझीलंडला भिडणार आहे. 17 चेंडूंत 41 धावांची नाबाद धडाकेबाज खेळी करून कांगारूंना विजय मिळवून देणारा मॅथ्यू वेड या लढतीचा ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरला.
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम पाकिस्तानला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सलामीवीर बाबर आझम आणि मोहंमद रिझवान यांनी पाकिस्तानला दणदणीत सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या गडय़ासाठी 71 धावांची भागीदारी केली. मोहंमद रिझवान याने 52 चेंडूंत तीन चौकार, चार षटकारांच्या जोरावर 67 धावा केल्या. तर बाबरने 34 चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने 39 धावा केल्या. त्यानंतर मैदानात उतरलेल्या फकर झमानने कमाल करत 32 चेंडूंत तीन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद 55 धावा करत पाकिस्तानची धावसंध्या 176 पर्यंत पोहचवली.
स्टॉयनीस,वेडने ऑस्ट्रेलियाला तारले
विजयासाठीचे 177 धावांचे आव्हान कांगारुनी 19 षटकातच पाच विकेटच्या मोबदल्यात पार केले . डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी 51 धावांची सलाम दिली . त्यानंतर मर्क्यूस स्टॉयनीस आणि मॅथ्यू वेड यांनी कमालीची तुफानी फलंदाजी करत पाकिस्तानच्या घशातून विजय खेचून आणला . स्टॉयनीसने 31 चेंडूमध्ये दोन चौकार , दोन षटकारांच्या मदतीने 40 धावा केल्या . तर वेडने 17 चेंडूत दोन चौकार , चार षटकारांच्या मदतीने 41 धावा ठोकत ऑस्ट्रेलियाचा विजय सोपा केला . 19 व्या षटकामध्ये वेडने शाहीन शाह आफ्रिदीला सणसणीत तीन षटकार लगावत विश्वचषकातील पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आणले .













































































