Last Updated on 18 Jan 2026 2:54 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
उरुण ईश्वरपूर येथील क्रीडापरंपरेला पुन्हा एकदा नवे बळ देणारी ‘निशिकांतदादा राज्यस्तरीय सुवर्ण चषक हॉकी स्पर्धा’ सोमवार, दि. १९ जानेवारी पासून सुरू होत असून, दि. २२ जानेवारीपर्यंत शहरातील पोलीस परेड मैदानावर ही स्पर्धा रंगणार आहे. निशिकांतदादा स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, याबाबत माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष व उरुण–ईश्वरपूर नगरपरिषदेचे नगरसेवक अजित पाटील यांनी दिली.
उरुण–ईश्वरपूर शहराला क्रीडा क्षेत्राचा समृद्ध वारसा आहे. माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले–पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विशेष सहकार्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून निशिकांतदादा स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यस्तरीय हॉकी स्पर्धांचे सातत्याने आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धांमुळे ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची मोठी संधी मिळत आहे.
या राज्यस्तरीय सुवर्ण चषक हॉकी स्पर्धेचे उद्घाटन सोमवार, दि. १९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव नाईक यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले–पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील नामवंत संघ सहभागी होत असून त्यामध्ये मुंबई रिपब्लिकन, मुंबई शहर पोलीस, एस.आर.पी.एफ. पुणे, सातारा डिस्ट्रिक्ट हॉकी असोसिएशन, फलटण महाराष्ट्र क्रीडा मंडळ, कोल्हापूर, कोल्हापूर पोलीस, छावा स्पोर्ट्स कोल्हापूर, खालसा युथ क्लब नांदेड तसेच निशिकांतदादा स्पोर्ट्स ‘अ’ व ‘ब’ संघ यांचा समावेश आहे.
स्पर्धेचा अंतिम सामना गुरुवार, दि. २२ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता खेळवण्यात येणार असून, त्यानंतर बक्षीस समारंभ होणार आहे. हा बक्षीस समारंभ उरुण ईश्वरपूरचे माजी नगराध्यक्ष ॲड. राजेंद्र उर्फ चिमण डांगे यांच्या शुभहस्ते, तर माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले–पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उरुण ईश्वरपूर शहरासह सांगली जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन निशिकांतदादा स्पोर्ट्स फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व नगरसेवक अजित पाटील यांनी केले आहे.












































































