Last Updated on 19 Jan 2026 1:01 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
भारतामध्ये खेळाला अनन्यसाधारण महत्त्व असून खेळामुळे युवक मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम घडतो. खेळाडू घडविण्याबरोबरच देशसेवक घडविण्याचे महत्त्वाचे कार्य निशिकांतदादा स्पोर्ट्स फौंडेशनने केले असून, याचा अभिमान केवळ माझाच नाही तर संपूर्ण उरुण ईश्वरपूर शहरालाही आहे, असे प्रतिपादन उरुण ईश्वरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी केले.
निशिकांतदादा स्पोर्ट्स फौंडेशनच्या वतीने ईश्वरपूर येथील पोलीस क्रीडा मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या निशिकांतदादा राज्यस्तरीय सुवर्ण चषक हॉकी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष केदार पाटील होते.
केदार पाटील म्हणाले, सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांच्या मार्गदर्शनाखाली निशिकांतदादा स्पोर्ट्स फौंडेशनची यशस्वी वाटचाल सुरू आहे. हॉकीसारख्या खेळामुळे उरुण ईश्वरपूरची ओळख राज्यापुरती मर्यादित न राहता देशपातळीवर पोहोचली आहे. या फौंडेशनने केवळ खेळाडू घडवले नाहीत, तर त्यांच्या आयुष्याला दिशा आणि गती दिली आहे. आज या फौंडेशनचे अनेक खेळाडू पोलीस दल, लष्कर तसेच विविध प्रशासकीय सेवांमध्ये देशसेवा करत आहेत, ही बाब अत्यंत अभिमानास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
स्वागत व प्रास्ताविक निशिकांतदादा स्पोर्ट्स फौंडेशनचे संस्थापक व उरुण ईश्वरपूर नगरपरिषदेचे नगरसेवक अजित पाटील यांनी केले. स्पर्धेच्या आयोजनामागील भूमिका, उद्दिष्टे आणि फौंडेशनची सामाजिक बांधिलकी त्यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केली. आभार प्रदर्शन प्रशिक्षक अशोक जाधव यांनी केले.
यावेळी उरुण ईश्वरपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजवर्धन पाटील, माजी नगरसेवक वैभव पवार, शकील सय्यद, प्रदीप लोहार, प्रांजली अर्बन बँकेचे चेअरमन अक्षय पाटील, दिनदयाळ सुतगिरणीचे संचालक सुमित पाटील, अशोकराव खोत, भास्कर मोरे, सयाजी जाधव, सांगली जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या कार्याध्यक्ष तैसिन आत्तार, शहराध्यक्षा तेजीस्वनी पाटील, प्रतिभा पाटील, राजेंद्र पवार, प्रा. जे.एस. पाटील, धनंजय पाटील, मधुकर हुबाले, उमेश जाधव, विकास अॅग्रोचे संस्थापक विकास पाटील, राष्ट्रीय हॉकी प्रशिक्षक मुस्ताक खाटीक, राष्ट्रीय खेळाडू विक्रम कळसे, रविंद्र खरात, संदीप थोरात, कादर मुंढे, स्वप्नील पाटील यांच्यासह अनेक मान्यवर, प्रशिक्षक व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.












































































