Last Updated on 16 Feb 2026 8:02 AM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
गावात, डोंगरदऱ्यात किंवा शेतशिवारात अचानक बिबट्याचा सामना होणे ही कल्पनाही अंगावर शहारा आणणारी असते. मात्र अशा वेळी घाबरून पळून जाणे हीच सर्वात मोठी चूक ठरू शकते, असा इशारा वन विभाग आणि वन्यजीव तज्ज्ञांनी दिला आहे. शांतता, संयम आणि जागरूकता हेच बिबट्यापासून सुरक्षित राहण्याचे प्रभावी उपाय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांपासून शेतशिवारात दबा धरून असलेल्या बिबट्याचा वावर आता लोकवस्तीपर्यंत येऊन पोहोचला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, मानवी वस्ती किंवा शहरात बिबट्या शिरल्याच्या घटना वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. यापूर्वीही अशा घटना घडल्या असून, त्यात काही ठिकाणी जीवितहानीही झाली आहे.
बिबट्याची मानवी वस्तीकडे होणारी धाव रोखण्यासाठी वन विभागाकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. पिंजरे लावणे, गस्त वाढवणे, सीसीटीव्ही व ड्रोनच्या माध्यमातून हालचालींवर लक्ष ठेवणे, तसेच ग्रामस्थांमध्ये जनजागृती करणे यांचा त्यात समावेश आहे. मात्र केवळ प्रशासकीय यंत्रणेवर अवलंबून न राहता नागरिकांनीही सजग राहणे आवश्यक आहे.
तज्ज्ञांच्या मते, बिबट्याचा सामना झाल्यास त्याच्याकडे थेट धाव घेऊ नये किंवा पाठी फिरवून पळू नये. शक्य असल्यास स्थिर उभे राहून आवाज न करता सावकाश मागे सरकावे. रात्रीच्या वेळी एकट्याने बाहेर जाणे टाळावे, शेतशिवारात काम करताना गटाने जावे आणि लहान मुले व पाळीव प्राणी यांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
काय काळजी घ्याल ?
🌑 बिबट्या ज्या परिसरात आहे,त्या परिसरात पहाटे आणि संध्याकाळी शक्यतो एकटे फिरू नका.
🌑 मोठमोठ्याने बोलत,आवाज करत जा.विजेरी वापरा.माणसाची चाहूल लागल्यावर बिबट्या शक्यतो समोर येत नाही.
🌑 बिबट्या गुरगुर आवाज करून तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करेल,मात्र तुम्ही एका जागेवर शांत आणि सावध उभे राहा.दोन्ही हात वर करा आणि हळूहळू तिथून मागे हटण्याचा प्रयत्न करा.
🌑 ऊस, मका अशी पिकं अगदी घरालगत घेऊ नका.या पिकांमध्ये बिबट्याला लपून बसता येतं.ही पिकं थोडी लांब लावा.
🌑 आपला परिसर स्वच्छ ठेवा.जिथे उरलेलं अन्न आणि इतर कचरा टाकला जातो,तिथे कुत्री आणि डुकरं येतात.हे सावज टिपायला बिबट्या तिथे येऊ शकतो.
🌑 चुकून बिबट्या समोर आलाच,तर त्याच्यावर उलटून हल्ला करण्याचा किंवा त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करू नये.
🌑 त्याच्या जवळ जाऊ नका,बिबट्या स्वतःच रक्षण करण्यासाठी अटॅक करू शकतो.
🌑 जागेवर स्थिर आणि सावध असाल तर बिबट्या लगेच अटॅक करत नाही.
🌑 कुठलीही प्रतिक्रिया न देता तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करावा,
🌑 वनविभागाच्या कारवाईदरम्यान गर्दी करून अडथळा आणू नका.
संरक्षणासाठी अशी घ्या काळजी
✪ बाहेर जाताना हातात काठी ठेवावी.काठीला घुंगरू बांधावे.जेणेकरून बिबट्या पळून जाऊ शकतो.
✪ शक्यतो मोठमोठ्याने बोला,तसेच रेडिओ अथवा मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी लावा.
✪ उन्हाळ्यात उघड्यावर अंगणात झोपू नये.उघड्यावर शौचास जाऊ नये
✪ घराला सभोवती कुंपण घाला तसेच परिसर स्वच्छ ठेवा.घराबाहेरील दिवे रात्रीच्या वेळी सुरू ठेवा.
✪ लहान मुलांची अधिक काळजी घ्यावी.शेतात लहान मुलांना घेऊन जाऊ नये.
✪ बिबट्या दिसल्यास त्याचा पाठलाग करू नका.आपल्यापेक्षा उंच असणाऱ्या प्राण्यांवर बिबट्या सहजासहजी हल्ला करीत नाही.
✪ मेंढपाळ व ऊसतोडणी कामगारांनी बिबट्यापासून संरक्षणासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक
लक्षात ठेवा :
बिबट्या माणसाला शिकार म्हणून पाहत नाही. त्याच्या क्षेत्रात आपण गेलो, की तो केवळ स्वतःचं रक्षण करतो. म्हणूनच भीती नव्हे, खबरदारी घ्या!
![]()








































































