Last Updated on 13 Jan 2026 8:53 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली/सुरेश मोहिते
मकर संक्रांतीचा उत्साह सर्वत्र दिसत असला, तरी ग्रामीण भागात मात्र खरी लगबग सुरू आहे ती ‘भोगी’ची. ‘रीन काढून सन करू नये’ या उक्तीला सार्थ ठरवत, शेतात जे पिकतं त्याचाच आनंद साजरा करण्याची आपली थोर कृषी परंपरा १३ जानेवारीला पुन्हा एकदा घराघरात अनुभवता येणार आहे. थंडीच्या कडाक्यात आरोग्याची रक्षण करणारी ‘बाजरीची भाकरी’ आणि रानातल्या ताज्या भाज्यांचे ‘कालवण’ हा या सणाचा मुख्य केंद्रबिंदू ठरत आहे.
भोगी म्हणजे निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. या दिवसात रानात पावट्याचा हंगाम जोरात असतो. वांगी, वाल, गाजर, हरभरा, चाकवत आणि मेथी अशा अनेक हिरव्यागार भाज्यांची जणू जत्राच शेतात भरलेली असते. विशेषतः रानातल्या वस्तीभोवती आणि तालीवरच्या पावट्याचा दरवळ आतापासूनच घराघरात जाणवू लागला आहे. वर्षभर ज्या अस्सल चवीची लोक वाट बघतात, तो पावट्याच्या कालवणाचा दिवस अखेर उंबरठ्यावर आला आहे.
निसर्गाचा आस्वाद हवा!
आपल्या कृषी संस्कृतीने दिली आहे. जो माल रानात उपलब्ध आहे, त्यातूनच सण साजरा करणे म्हणजे निसर्गाशी एकरूप होणे. मात्र, आजची सुशिक्षित पिढी मातीपासून दूर जात असल्याची प्रचिती एका घटनेतून समोर आली आहे. एका शहरातील हायस्कूल शिक्षिका जेव्हा कृषी पर्यटनासाठी रानात गेल्या, तेव्हा त्यांना पावट्याचे झाड असते की वेल, हे ओळखता आले नाही. पावट्याच्या जाळीवर उभे असतानाही ‘झाड कुठे आहे?’ असा प्रश्न विचारल्याने, आजच्या पिढीला निसर्गाची ‘शिकवणी’ देण्याची गरज निर्माण झाली आहे, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
बाजरी आणि तीळ : पूर्वजांचे प्रगत आहारशास्त्र
भोगीच्या दिवशी तिळ लावलेली बाजरीची भाकरी खाण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बाजरी आणि तीळ हे दोन्ही घटक शरीरात उष्णता टिकवून ठेवतात, ज्यामुळे थंडीत होणारे आजार लांब राहतात. बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजूर प्रचंड कष्टाचे काम करूनही जे कणखर दिसतात, त्यामागे त्यांचे ‘बाजरी’वरील प्रेम हेच मुख्य कारण असल्याचे मानले जाते. आपल्या पूर्वजांचे हे कृषी विज्ञान किती प्रगत होते, याची जाणीव भोगीच्या निमित्ताने पुन्हा एकदा होत आहे.
यंदाची भोगी ही केवळ गोडधोड खाण्याचा दिवस नसून, आपल्या मातीतील समृद्ध वारसा जपण्याचा आणि पुढच्या पिढीला निसर्गाची ओळख करून देण्याचा दिवस ठरो, हीच अपेक्षा.









































































