Last Updated on 19 Feb 2026 6:34 PM by Sanjay Patil/Adhorekhit
भारतीय सेनेची मानवंदना आणि शिवरायांच्या जयघोषाने महाराष्ट्र सदन दुमदुमले
नवी दिल्ली ।
‘जय भवानी, जय शिवाजी’चा गगनभेदी जयघोष, ढोल-ताशांचा गजर, तुतारींचा निनाद आणि शाहिरी पोवाड्यांच्या साथीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज देशाच्या राजधानीत अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी भारतीय सेनेच्या तुकडीने छत्रपती शिवाजी महाराजांना विशेष मानवंदना दिली.
दिल्लीतील शिवजयंती राष्ट्रोत्सव समितीतर्फे कस्तुरबा गांधी मार्गस्थित नवीन महाराष्ट्र सदनात सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि खा. विशाल पाटील, निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला, निवास आयुक्त गुंतवणूक सुशील गायकवाड, माहिती संचालक हेमराज बागुल यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आणि पाळणा पूजन आणि पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शिवजयंती राष्ट्रोत्सव समिती, नवी दिल्ली यांनी तयार केलेल्या ‘शिवकालीन दर्शिका 2026’ या कॅलेंडरचे प्रकाशन संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आले. या कॅलेंडरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते निर्वाणापर्यंत घडलेल्या ऐतिहासिक घटनांचा तारखेनुसार सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे. नाशिकचे शिवराय ढोल पथक, लेझीम, वारकरी दिंडी आणि झेंडा पथकाच्या निनादात महाराष्ट्र सदन परिसरात भव्य ‘शिव-शोभायात्रा’ काढण्यात आली.

या कार्यक्रमास सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार आणि जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, उपअभियंता किरण चौधरी, आशुतोष द्विवेदी व्यवस्थापक प्रमोद कोलपते, मुख्य सुरक्षा अधिकारी अनिल चोरगे अनिल यांच्यासह महाराष्ट्र सदन व परिचय केंद्राचे कर्मचारी आणि दिल्लीसह हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील विविध भागांतून आलेले मराठी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.











































































