Last Updated on 13 Mar 2026 7:51 PM by Sanjay Patil/Adhorekhit
तिघांना अटक, ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त
सांगली ।
सद्यस्थितीमध्ये आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युध्दाच्या तणावपूर्ण पार्श्वभूमिवर जिल्ह्यात एलपीजी सिलेंडर वितरण, इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याकामी जिल्हा प्रशासनामार्फत गॅस एजन्सींची काटेकोर तपासणी करण्यात येत आहे. यासाठी नियुक्त दक्षता व फिरत्या पथकांमार्फत ३७ गॅस एजन्सींची तसेच ३१ हॉटेल्सची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये एकूण ७१ हजार २०० रूपयांचा मुददेमाल जप्त करून ३ एजन्सीवर गुन्हे दाखल व ३ जणांना अटक करण्यात आली.
जिल्ह्यातील इंधन पुरवठ्याच्या अनुषंगाने आढावा घेऊन जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, सांगली जिल्ह्यात सध्या एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यानुसार एचपीसीएल कंपनीचा ३६६२ मेट्रिक टन, बीपीसीएल कंपनीचा १०३९ मेट्रिक टन व आयओसीएल कंपनीचा ५७ मेट्रिक टन इतका एलपीजी साठा उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्ह्यातील घरगुती ग्राहकांना गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीतपणे सुरू राहणार आहे. ऑनलाईन बुकिंग केलेल्या सर्व ग्राहकांना उपलब्धतेनुसार क्रमाने सिलिंडरचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
घरगुती एलपीजी गॅसचे सुरळीत वितरण व्हावे तसेच घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी जिल्हा स्तरावर दक्षता व फिरते पथक नियुक्त करण्यात आले आहे. गॅस एजन्सीकडून सिलिंडरचा गैरमार्गाने पुरवठा केल्याचे आढळल्यास अथवा घरगुती एलपीजीचा वापर व्यावसायिक कारणासाठी होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.












































































