Last Updated on 19 May 2023 8:25 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । रिझर्व्ह बँकेने आज 2 हजार रुपयांच्या नोटेबाबत मोठी घोषणा केली आहे. बाजारातून 2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.30 सप्टेंबर 2023 पर्यंत नोटा वापरता येणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.रिझर्व्ह बँक आता 30 सप्टेंबरपर्यंत दोन हजाराच्या नोटा परत घेणार आहे.या नोटा जारी करु नये असे तातडीचे आदेश रिझर्व बँकेने सर्व बँकांना आज दिले.
बँकांनी 2 हजार रुपयांची नोट ग्राहकांना देऊ नये.ती चलनात आणू नये.येत्या 23 मे पासून 2 हजार रुपयांच्या नोटा बँकेतून बदलून मिळणार आहेत.जास्तीत जास्त 20 हजार रुपयांपर्यंतच्या 2 हजाराच्या नोटा या बँकेतून बदलून मिळू शकतील,असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.येत्या 30 सप्टेंबर पर्यंत 2 हजार रुपयांच्या नोटा बदलून मिळणार आहेत.म्हणजेच,30 सप्टेंबर पर्यंत 2 हजार रुपयांच्या वैध असतील.दोन हजारच्या नोटांची चलनी वैधता कायम राहील असे रिझर्व बँकेनं स्पष्ट केले आहे.
नोटा या तारखेपासून बदलता येणार
रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांच्या नोटा असलेल्या नागरिकांना बँकांमधून नोटा बदलण्याची सूचना केली आहे.बँकांमध्ये 23 मे पासून ही 2 हजारांची रुपयांची नोट बदलण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.नागरिकांना 30 सप्टेंबरपर्यंत नोटा बदलता येणार असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे.या नोटा पुन्हा बँकेत जमा करण्यासाठी 23 मे ते 30 सप्टेंबरपर्यंतचा कालावधी असणार आहे.अप्रत्यक्षपणे 2 हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
२ हजार रुपयांच्या नोटा अशा आल्या चलनात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 मध्ये देशवासियांना आश्चर्याचा धक्का देत देशात नोटबंदीची घोषणा केली होती.याअंतर्गत 1 हजार आणि 500 रुपयाच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर बाजारात पुन्हा 500 रुपयाची नवी नोट आणण्यात आली, मात्र 1 हजार रुपयांच्या जागी 2 हजार रुपयांची नोट आणण्यात आली होती.या नोटा गेल्या 6 वर्षांपासून चलनात आहेत.पण या नोटा बंद होणार असल्याच्या चर्चा सातत्याने समोर येत होत्या.












































































