Last Updated on 01 Jul 2026 9:34 AM by Sanjay Patil/Adhorekhit
ईश्वरपूर ।
संपूर्ण भारत देशात केवळ १२ ते १५ बँकांमध्ये इंटरनेट बँकिंग व्यवस्था दिली जात आहे. आज ही व्यवस्था आपल्या बँकेमध्ये सुरू करताना मनस्वी आनंद होत आहे. ही इंटरनेट बँकिंग व्यवस्था राजारामबापू सहकारी बँकेच्या इतिहासातील माईल स्टोन ठरेल,असा विश्वास माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांनी राजारामबापू सहकारी बँकेच्या ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना व्यक्त केला.
बँकेचे अध्यक्ष विजयराव यादव सभेच्या अध्यक्षस्थानी होते. माजी अध्यक्ष प्रा.शामराव पाटील, उपाध्यक्ष माणिकराव पाटील, देवराज पाटील, बाळासाहेब पाटील, विजयराव पाटील, व्यवस्थापकीय संचालक सीए प्रदीप बाबर, बी.के.पाटील, विष्णुपंत शिंदे, शशिकांत पाटील, उपसभापती प्रकाश पाटील, प्राचार्य आर.डी.सावंत, महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, तालुकाध्यक्षा सुनिता देशमाने प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी इंटरनेट बँकिंग सुविधेचे उदघाट्न करून उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या शाखा, अधिकारी,कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
आ.पाटील पुढे म्हणाले, देशातील,राज्यातील फार कमी बँकामध्ये ग्राहकांना इंटरनेट बँकिंग सेवा दिली जात आहे. या सेवेमुळे आपल्या बँकेच्या प्रगतीस झपाट्याने गती मिळेल. गेल्या ४६ वर्षात आपल्या बँकेने लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या शिकवणीप्रमाणे वाटचाल करीत ग्राहकांचा विश्वास संपादन केलेला आहे. २७८५ कोटींच्या ठेवी,१७५९ कोटींची कर्जे, १७.५० कोटींचा निव्वळ नफा,४६०० कोटींची वार्षिक उलाढाल आणि ४९ शाखामधून आपली यशस्वी वाटचाल सुरु आहे. भविष्यात बँकेच्या शाखांचा आकडा १०० करणे हे आपले उद्दिष्ट राहील.
अध्यक्ष विजयराव यादव म्हणाले, आपण माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या कुशल मार्गदर्शना खाली पारदर्शी व राजकारण विरहित कारभार करत असून सध्या बँकेची आर्थिक स्थिती भक्कम आहे. येत्या मार्चपर्यंत बँकेचा व्यवसाय ५ हजार कोटीच्यावर जाईल असा आमचा प्रयत्न आहे. प्रा. साहिल मुल्ला कासेगाव यांनी सायबर क्राईम या विषयावर सभासदांना मार्गदर्शन केले.
प्रारंभी माजी अध्यक्ष प्रा.शामराव पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी संचालक डॉ. प्रकाश पाटील यांनी श्रद्धांजली ठराव मांडला. व्यवस्थापकीय संचालक सीए प्रदीप बाबर सभेचे नोटीस वाचन केले. तर जनरल मॅनेंजर श्रेणिक मगदूम यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले. उपाध्यक्ष माणिकराव पाटील यांनी आभार मानले. संदीप तांबवेकर यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी मुनीर पटवेकर, दामाजी मोरे, माणिकराव पाटील, संचालक संजय पाटील, कमल पाटील, देवराज देशमुख, धनाजी पाटील, प्रशांत पाटील, शिवाजी मगर, राजेश पाटील, शहाजी माळी, बाबुराव हुबाले, डॉ.एन.टी.घट्टे, प्राचार्या दीपा देशपांडे, विठ्ठल पाटील, कार्तिक पाटील, सुहास पाटील, रामभाऊ माळी, व्ही.एन.पाटील, दिलीपराव पाटील, पोपटराव जगताप, ब्रम्हानंद पाटील, पै.अशोक मोरे यांच्यासह बँकेचे संचालक, अधिकारी,सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चालकाला विशेष श्रेणीचा ऐतिहासिक ठराव…
क्लार्क व शिपाई यांना तीन वर्षाची प्रशिक्षणार्थी ऑर्डर दिली जाते. ते तीन वर्षात आपल्या कामात पारंगत होतात. मात्र चालक हा पहिल्या दिवसा पासून पूर्ण प्रशिक्षितच असतो. म्हणून त्याला शिपाई व क्लार्कच्यामध्ये एक विशेष श्रेणी देण्या चा ऐतिहासिक ठराव बँकेत करण्यात आला.











































































