Last Updated on 02 Aug 2025 11:04 PM by Sanjay Patil/Adhorekhit
शिराळा तहसीलदार श्यामला खोत-पाटील यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम
सांगली । शिराळा तालुक्याने आज प्रशासनाशी संवाद साधण्याच्या पद्धतीत अनोखा बदल घडवला. ‘QR कोड स्कॅन करा आणि शिराळा तहसीलदारांशी थेट संपर्क साधा’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ आमदार सत्यजित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. या डिजिटल माध्यमाच्या साहाय्याने नागरिकांना त्यांच्या अडचणी, तक्रारी, सूचना किंवा मागण्या थेट तहसीलदारांपर्यंत पोहोचवण्याची सुविधा निर्माण झाली आहे.
हा उपक्रम सुरू झाल्यामुळे नागरिकांना तहसील कार्यालयात वारंवार यायची गरज राहिलेली नाही. मोबाईलवर QR कोड स्कॅन करून थेट संवाद शक्य झाला आहे. त्यामुळे वेळेची बचत, प्रवासाचा खर्च आणि शासकीय कामांमधील विलंब टळणार आहे. यामुळे शासकीय कामकाज अधिक पारदर्शक आणि गतिमान होण्यास मदत होईल.
शहरापासून दूर असलेल्या ग्रामीण भागातील लोकांसाठी ही सेवा विशेष लाभदायक ठरणार आहे. आपली कामे प्राधान्याने आणि वेळेत मार्गी लागली पाहिजेत, अशी अपेक्षा असलेल्या नागरिकांसाठी हे तंत्रज्ञान आशेचा नवा किरण ठरत आहे.
या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी सत्यजित देशमुख सांगितले की, शिराळा तालुका नेहमीच प्रगतीचा ध्यास घेत असतो. प्रशासन व जनतेमधील दुरावा कमी करून, विश्वासार्ह व जबाबदार पाऊल आहे.
तहसीलदार श्यामला खोत-पाटील यांनी यावेळी सांगितले की, आता नागरिकांचे प्रश्न अधिक स्पष्टपणे समजतील आणि तत्परतेने उत्तर देण्याची क्षमताही वाढेल.
डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासनाशी थेट संवाद साधण्याची ही सुविधा शिराळा तालुक्याच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणार आहे. स्वयंपूर्ण आणि उत्तरदायी शासकीय व्यवस्थेकडे वाटचाल करणाऱ्या शिराळ्यासाठी हा उपक्रम प्रभावी ठरणार आहे.











































































