Last Updated on 10 Jan 2026 4:25 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष,युवा नेते प्रतिकदादा पाटील यांच्या संकल्पनेतून,कामगार कल्याण व जिमखाना समितीच्या अध्यक्षा,कारखान्याच्या संचालिका डॉ.सौ.योजना शिंदे-पाटील यांच्या पुढाकाराने साखराळे येथील राजारामबापू पाटील खुल्या मैदानात आयोजित पोलीस भरती प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्याने ग्रामीण भागातील मुला-मुलींच्यामध्ये “आपणही पोलीस भरती होऊ शकतो,”हा आत्मविश्वास निर्माण झाला. या जर्मन तंत्रज्ञानावर आधारित पोलीस भरती सराव परीक्षेत सांगली,सातारा,कोल्हापूर, सोलापूर,पुणे आदी जिल्ह्यातील 1200 च्यावर मुला – मुलींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. माजी मंत्री आ.जयंतराव पाटील, युवा नेते प्रतिकदादा पाटील यांनी प्रत्यक्ष मैदानावर थांबून मुला – मुलींना मार्गदर्शन केले,प्रोत्साहन दिले.
प्रारंभी आ.जयंतराव पाटील यांनी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून सराव परीक्षेचा शुभारंभ केला. यावेळी दिवसभर मुलांच्यासाठी 1600 मीटर व 100 मीटर धावणे आणि गोळाफेक, तर मुलींच्यासाठी 800 मिटर, 100 मिटर,व गोळा फेक घेण्यात आले. प्रत्येक परीक्षार्थीच्या धावण्याची अचूक वेळ,गोळ्याचे अंतर मोजून त्यांना विशेष सूचना, मार्गदर्शन करण्यात आले.
आ.जयंतराव पाटील म्हणाले,हा आगळा- वेगळा प्रयोग आहे. यातून ग्रामीण भागातील मुला मुलींच्यामध्ये पोलीस भरती परीक्षेची भीती निघून जाईल आणि त्यांच्यामध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण होईल.
प्रतिकदादा पाटील म्हणाले, आम्ही अद्यावत जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करून वेळेची अचूक मोजणी केली आहे. त्यामुळे परिक्षार्थीना आपल्या कामगिरीतील चुका व दुरुस्त्या लक्षात आल्या. या सराव परीक्षेला परीक्षार्थीचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. आम्ही भविष्यातही पोलीस भरती व विविध भरतीस मुला- मुलींना सहकार्य करणारे उपक्रम राबवू.
संचालिका डॉ.सौ.योजना शिंदे -पाटील, शशिकांत जगताप,पवन भोसले- पाटील, अनिकेत पाटील,तसेच विविध स्पर्धा परिक्षा अकॅडमीचे संचालक व स्वयंसेवकांनी ही सराव परिक्षा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
याप्रसंगी वाळवा तालुका युवक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष संग्राम जाधव,त्यांचे सहकारी,कारखान्याचे अधिकारी,कर्मचारी, विद्यार्थी – विद्यार्थिनी,तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.












































































