Last Updated on 06 Oct 2024 10:59 AM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । सणासुदीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी (दि.५) शेतकऱ्यांना मोठी भेट दिली. त्यांनी आज प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 18 वा हप्ता आज जारी केला. नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. वाशिममध्ये असताना त्यांनी या 18 व्या हप्त्याच्या वितरणास प्रारंभ केला. पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजना आणि पीएम शेतकरी सन्मान योजना या दोन्ही योजनांचे प्रत्येकी 2 हजार रुपये मिळणार आहेत. म्हणजेच शेतकऱ्यांना यावेळी सोबतच 4 हजार रुपये मिळणार आहेत.
9.4 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळणार
पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एक वर्षात एकूण 6 हजार रुपये दिले जातात. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना आतापर्यंत 17 हप्त्यांमध्ये 34 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. आता शेतकऱ्यांना 18 व्या हप्त्याच्या वितरणास सुरुवात झाली आहे. देशभरातील 9.4 कोटी शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत 18 व्या हप्त्याच्या वितणासाठी केंद्र सरकारने एकूण 20 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
नमो महासन्मान योजनेचेही 2 हजार रुपये…
केंद्र सरकारच्या पीएम शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात. म्हणजेच शेतकऱ्यांना वर्षाला 12 हजार रुपये मिळतात. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नमो शेतकरी महासन्मान योनजेचेही 2 हजार रुपये महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील जवळपास 91.53 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हा पाचवा हप्ता आहे.
शेतकऱ्यांना एकूण 4 हजार रुपये …
पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजना आणि पीएम शेतकरी सन्मान योजना या दोन्ही योजनांचे प्रत्येकी 2 हजार रुपये मिळणार आहेत. म्हणजेच शेतकऱ्यांना यावेळी सोबतच 4हजार रुपये मिळणार आहेत. सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना या पैशांची मदत होणार आहे.









































































