Last Updated on 02 Feb 2026 10:20 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
मातापित्याशी गोड बोला, वडीलधाऱ्यांचा मान राखा, कोणाशीही उद्धट वर्तन करू नका, अभ्यासातील सातत्य आणि परिश्रमाच्या तयारीतून करियर चांगले घडते; असा मौलिक सल्ला उद्योजक सर्जेराव यादव यांनी युवा पिढीला दिला.
ईश्वरपूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. वाळवा तालुका शिक्षण संस्थेचे मानद सचिव ॲड. बी.एस.पाटील अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य डॉ.ए.एम.जाधव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
उद्योजक सर्जेराव यादव म्हणाले, अपयश आणि संघर्ष वाट्याला आला तरी डगमगू नका. आई-वडिलांच्या आशीर्वादामुळे आणि आपल्या कष्टातून समृद्धी मिळू शकते;असा विश्वास त्यांनी अनेक उदाहरणांमधून दिला.
ॲड.बी.एस. पाटील म्हणाले, शिस्त, सर्वांविषयी आदरभाव आणि कष्टाच्या तयारीतून युवा पिढीला चांगली दिशा मिळते.
प्राचार्य डॉ. ए. एम. जाधव यांनी आपल्या स्वागत मनोगतात महाविद्यालयाच्या शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक विभागातील उल्लेखनीय कामगिरीची माहिती दिली. उद्योजक यादव यांचा परिचय वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.डॉ.अशोक शिंदे यांनी करून दिला.
स्नेहसंमेलनाचे कार्याध्यक्ष शारीरिक शिक्षण संचालक प्रा.डॉ.एच.ए.नारायणकर यांनी अहवाल वाचन केले. प्रा.डॉ. मंगल लोंढे, प्रा.संतोष पाटील यांची उपस्थिती होती.प्रा.डॉ.गोरखनाथ किर्दत, प्रा.अमोल चांदेकर, प्रा.युवराज वाघमारे,प्रा. स्वाती चव्हाण यांनी बक्षीस वितरणाचे संयोजन केले. प्रा. गणेश स्वामी, प्रा सुस्मिता चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.












































































