Last Updated on 05 Jan 2026 10:14 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ईश्वरपूर ते फिनलंड… मुक्तांगण प्ले स्कूलचे उपक्रम जागतिक व्यासपीठावर
सांगली । जागतिक पातळीवर सर्वोत्कृष्ट असणाऱ्या फिनलंड देशाची शिक्षणपद्धती प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी येथील मुक्तांगण प्ले स्कूल अँड ॲक्टिव्हिटी सेंटरचे संस्थापक व बालशिक्षणाचे अभ्यासक विनोद व वर्षाराणी मोहिते या दाम्पत्याची निवड झाली आहे. बालशिक्षण क्षेत्रातील त्यांच्या भरीव कार्याची दखल घेत झालेल्या या निवडीमुळे ईश्वरपूरच्या शैक्षणिक क्षेत्राला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान मिळाला आहे.
फिनलंड मध्ये कार्यरत असणाऱ्या क्रिएटिव्ह अॅण्ड कंटेम्पररी एज्युकेशन या संस्थेतर्फे पहिल्या आंतरराष्ट्रीय सृजनशील शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.भारतासह जगभरातील शिक्षणतज्ञ सहभागी असतील. ११ ते १५ मे दरम्यान हेलसिंकी – फिनलंडमध्ये होणाऱ्या सृजनशील शिक्षण परिषदेत मुक्तांगणचे उपक्रम जागतिक व्यासपीठावर सादर होतील.
फिनलंडमधील शाळांना भेटी, विविध शैक्षणिक कार्यशाळांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. या परिषदेत संशोधनावर विशेष भर देण्यात आला आहे. फिनलंड स्थित शिक्षणतज्ञ शिरीन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेचे नियोजन सुरू आहे.
मुक्तांगणच्या विविध उपक्रमांवर आधारित मोहिते दाम्पत्य संशोधन पेपर सादर करणार आहेत. परिषदेत सादर झालेल्या भारतातील शिक्षण तज्ञांच्या संशोधन लेखांचे संकलन करून स्वतंत्र पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे.
मुक्तांगणचे उपक्रम आतां जागतिक व्यासपीठावर
बालशिक्षण क्षेत्रात कार्यरत असतांना मुक्तांगण मध्ये सातत्यपूर्ण नवकल्पना, सृजनशील उपक्रम, विद्यार्थी केंद्रित खेळातून आणि अनुभवातून शिक्षणपद्धती राबवल्या जातात. गेल्या १५ वर्षांपासून दोन ते सहा वयोगटातील मुलांसाठी काम करणाऱ्या मोहिते दाम्पत्याला परिषदेमुळे जागतिक पातळीवर आपले शैक्षणिक संशोधन आणि अनुभव मांडण्याची संधी मिळणार आहे. त्यांच्या निवडीने शिक्षण क्षेत्रातून स्वागत होत आहे. विनोद मोहिते यांचे शिक्षण मुंबई विद्यापीठातून एम.ए. एम.एड् झाले आहे. तर वर्षाराणी मोहिते यांचे शिक्षण बी.ए.डी.एड् झाले आहे.गेली सतरा वर्षे मोहिते दाम्पत्य बालशिक्षणात वेगवेगळे प्रयोग करत आहे. त्यांना राष्ट्रीय व राज्य पातळीवर अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
फिनलंड जगभरात सर्वात आनंदी देश….कारण शिक्षण पद्धती….!
फिनलंड देश गेली अनेक वर्षं आनंदी देश म्हणून जगभरात सर्वोच्च स्थानावर आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, इथली शिक्षण पद्धती आहे. ही सर्वोत्तम शिक्षण पद्धती जाणून घेतांना फिनलंडच्या शाळांमध्ये प्रत्यक्ष भेटी, वर्गपद्धती, मूल्यमापन पद्धती, शिक्षकांची भूमिका विद्यार्थी-केंद्रित शिक्षण, आनंददायी अध्यापन, २१ व्या शतकातील कौशल्ये यांवर आधारित प्रशिक्षण, प्रात्यक्षिके, कार्यशाळा आणि केस स्टडीज यांचा अभ्यास केला जाईल. विविध देशांतील वेगवेगळ्या वयोगटात काम करणाऱ्या शिक्षकांशी संवाद व अनुभवांची देवाणघेवाण, आंतरराष्ट्रीय सहकार्य व शैक्षणिक संस्कृतीबाबत चर्चा होईल. विविध वयोगटातील शिक्षणावर जागतिक पातळीवर सुरू असलेल्या संकल्पना यानिमित्ताने पुढे येतील.









































































