Last Updated on 05 Dec 2021 6:24 AM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई ।
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्यावेळी दिव्यांग उमेदवार लिहिण्यासाठी सक्षम नसल्यास त्यांच्या मागणीप्रमाणे परीक्षेच्यावेळी लेखनिक तसेच अन्य सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने आयोगाच्या संकेतस्थळावर ‘दिव्यांग उमेदवारांकरीता मार्गदर्शक सूचना प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत.
त्यानुसार आयोगामार्फत प्रसिध्द करण्यात येणाऱ्या जाहिरातीस अनुसरुन अर्ज सादर केल्यानंतर संबंधित दिव्यांग उमेदवारांनी लेखकाची मदत घेण्याची आणि/अथवा भरपाई वेळेची आवश्यकता असल्यास आयोगाकडे संबंधित सर्व कागदपत्रांसह विनंती अर्ज (प्रपत्र-१ अथवा प्रपत्र-२) सादर करुन पूर्व परवानगी घेणे अनिवार्य आहे.
आयोगामार्फत दिनांक २ जानेवारी २०२२ रोजी आयोजित ‘राज्य सेवा पूर्व परीक्षा – २०२१’ करीता आयोगास अर्ज सादर केलेल्या व लेखनिकाची मदत घेण्याची आणि/अथवा भरपाई वेळेची आवश्यकता असलेल्या दिव्यांग उमेदवारांनी विहित नमुन्यातील विनंती अर्ज संबंधित सर्व कागदपत्रांसह pre-examination@mpsc.gov.in या ईमेल आयडीवर दिनांक १५ डिसेंबर २०२१ पर्यंत पाठविणे आवश्यक आहे. ज्या उमेदवारांनी यापूर्वीच प्रस्तुत परीक्षेसाठी विहित नमुन्यातील विनंती अर्ज संबंधित सर्व कागदपत्रांसह सादर केला आहे अशा उमेदवारांनी परत विनंती अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही.
केवळ संबंधित जाहिरातीस अनुसरुन ऑनलाईन अर्ज सादर करताना लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळेकरिता दावा केला म्हणून उमेदवारांना लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळेची सवलत देय असणार नाही. ऑनलाईन अर्जाद्वारे दावा करुन उमेदवारांनी विहित पध्दतीने आयोगाकडून स्वतंत्र पूर्व परवानगी घेतली असल्यास लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळेची सवलत देय राहील,असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पत्रकात म्हटले आहे.
दिव्यांग उमेदवारांकरीता मार्गदर्शक सूचना PDF मध्ये
दिव्यांग उमेदवारांकरीता मार्गदर्शक









































































