Last Updated on 17 Jan 2026 5:14 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
सध्या महाराष्ट्र राज्य औद्योगिक क्षेत्रात देशात प्रथम क्रमांकावर आहे,त्याचा पाया लोकनेते राजारामबापू पाटील यांनी आपल्या उद्योगमंत्री पदाच्या काळात घातलेला आहे. त्यांनी त्यावेळी संपूर्ण राज्यात औद्योगिक वसाहती उभा करून मोठया प्रमाणात रोजगार उभा केला. मात्र सध्या राज्यातील उद्योग राज्यात राहतील का बाहेर जातील,असा प्रश्न निर्माण झाला आहे,अशी भावना जेष्ठ पत्रकार वसंत भोसले यांनी व्यक्त केली. स्व.बापूंनी जे विकासाचे मंदीर उभा केले, त्यावर कळस चढविण्याचे काम माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांनी केले आहे,असेही त्यांनी सांगितले.
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या ४२ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित
व्याख्यानात “आठवणीतील बापू व सद्य परि स्थिती”या विषयावर ते बोलत होते. राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील अध्यक्षस्थानी होते. राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी.आर.पाटील, राजारामबापू ज्ञानप्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा.शामराव पाटील, राजारामबापू सहकारी बँकेचे अध्यक्ष विजयराव यादव प्रामुख्याने उपस्थित होते.
वसंत भोसले पुढे म्हणाले,बापूंनी सहकारी संस्थांचे जाळे निर्माण करून लोकांचे जीवनमान उंचावले. आमदार,मंत्री म्हणून संधी मिळाल्या नंतर राज्याच्या जडणघडणीत मोलाचे योगदान केले आहे. मात्र त्यांना जितक्या प्रमाणात संधी मिळायला हवी होती,तितक्या प्रमाणात मिळालेली नाही. बापूंनी १९७८ ला जनता पक्षाचे ९९ आमदार निवडून आणले. मात्र वाळव्यातील निकालाने त्यांचे मुख्य मंत्रीपद हुकले. तसेच त्यांनी परत काँग्रेस पक्षात यावे,असा इंदिरा गांधी यांचा आग्रह होता. त्यावेळी बापूंनी आपली वैचारिक भूमिका बदलली असती,तर त्यांना राज्याच्या सर्वोच्च पदाची संधी मिळाली असती. खुजगाव धरणाचा वाद हा व्यक्तिगत नव्हता. धरण कुठे बांधायचे? यावरून निर्माण झालेला वैचारिक भूमिकेचा वाद होता. मात्र त्यास दादा- बापू वादाचे स्वरूप देण्यात आले,हे दुर्दैवी आहे. बापूंनी वाळवा तालुक्यासह सांगली जिल्ह्यास पाणी देण्यासाठी जे कष्ट घेतले,मोठी राजकीय किंमत मोजून,जी राजकीय भूमिका घेतली,त्यातूनच पुढे वाळवा तालुक्यासह सांगली जिल्ह्यातील शेतीला पाणी मिळाले आणि आर्थिक समृद्धी आली. सध्या सांगली जिल्हा हा दरडोई उत्पन्नात संपूर्ण राज्यात ६ व्या क्रमांकावर आहे,याचे श्रेय बापूंना द्यावे लागेल. बापूंना प्रत्येक टप्प्यावर तीव्र संघर्ष करावा लागला आहे. मात्र त्यांनी कधीही व्यक्तिगत कटुता निर्माण होऊ दिली नाही. बापूंचे स्मरण करताना त्यांचे जीवनकार्य आणि राजकीय विचार समजून घ्यायला हवे.
प्रारंभी प्रा.शामराव पाटील त्यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. याप्रसंगी माणिकराव पाटील, शशिकांत पाटील, सुस्मिता जाधव, सुनिता देशमाने, कमल पाटील, डॉ. एन.टी.घट्टे, सतिश पाटील, संग्राम जाधव, देवराज देशमुख, राजेंद्र चव्हाण, विकास पवार,आर.डी.माहुली, डी.एम.पाटील यांच्यासह मान्यवर, अधिकारी – कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालक कार्तिक पाटील यांनी आभार मानले. प्रसिद्धी अधिकारी विश्वनाथ पाटसुते यांनी सूत्रसंचालन केले.












































































