Last Updated on 18 Jan 2026 12:25 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या दूरदृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रात विकासाची गंगा वाहू लागली असून, चांदोली धरणाच्या माध्यमातून शेती, अर्थकारण आणि जीवनमानात आमूलाग्र बदल घडून आला, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. राजेंद्र कुरळपकर यांनी केले.
लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या ४२व्या पुण्यतिथीनिमित्त वाळवा तालुका अकुशल कामगार संघटना (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष) यांच्या कार्यालयात आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.
डॉ. कुरळपकर म्हणाले, लोकनेते राजारामबापूंमुळे चांदोली धरणाची निर्मिती झाली. या धरणाच्या पाण्यामुळे सांगली, कोल्हापूर, सोलापूर तसेच काही प्रमाणात सातारा जिल्ह्यांतील शेतीला मोठा दिलासा मिळाला. शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याने शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती झाली आणि संपूर्ण परिसराचा वेगाने विकास झाला.
राजारामबापू पाटील आणि वसंतरावदादा पाटील यांच्यात श्रेयवाद न करता विकास आणि लोकहिताला प्राधान्य देणारे विधायक राजकारण होते. खुजगाव व चांदोली धरणांवरील वाद तडजोडीने मिटवून चांदोली धरणाचा मार्ग मोकळा झाला. यासाठी राजारामबापूंनी मोठे जनआंदोलन उभे करत विकासात्मक राजकारणाचा आदर्श निर्माण केला, असे त्यांनी सांगितले.
या तडजोडीत राजारामबापूंची ‘आडव्या पाटाने पाणी’ ही संकल्पना तसेच वसंतरावदादांची ‘उपसा सिंचन योजना’ मान्य करण्यात आली. आज दोन्ही माध्यमांतून परिसरातील शेतीला पाणी मिळत आहे. डावा व उजवा कालवा यांची कामेही मोठ्या प्रमाणात पूर्ण झाली असून, या विकासात्मक धोरणांमुळे पश्चिम महाराष्ट्राचा चेहरा-मोहरा बदलला आहे, असेही त्यांनी नमूद केले.
लोकनेते राजारामबापूंची दूरदृष्टी आणि शेतीच्या पाण्याचे महत्त्व आजच्या पिढीने समजून घेणे गरजेचे असून, त्यांचे विचार आणि कार्य पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी समाजातील प्रत्येकावर आहे. हेच खऱ्या अर्थाने बापूंना अभिवादन ठरेल, असे डॉ. कुरळपकर यांनी सांगितले.
यावेळी अकुशल कामगार संघटनेचे प्रमुख सागर चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य सरचिटणीस अरुण कांबळे, माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, संचालक राजकुमार कांबळे, कामगार सेल तालुकाध्यक्ष सागर चव्हाण, कार्याध्यक्ष शरद यादव, खजिनदार प्रदीप पवार, समाजसेविका वनिता कांबळे, वर्षा चव्हाण, नानासो लोंढे, आनंदराव महापुरे, तानाजी चव्हाण, भाऊसाहेब वायदंडे, गणेश कांबळे, प्रकाश चव्हाण, जयश्री शेंडगे, संगीता कांबळे, जयश्री कांबळे, कुमोदीनी गाडे, आनंदी कांबळे यांच्यासह अन्य मान्यवर व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्रास्ताविक सागर चव्हाण यांनी केले तर आभार शरद यादव यांनी मानले.












































































