Last Updated on 21 Jan 2026 3:52 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई ।
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या महिलांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान काही लाभार्थ्यांकडून चुकीचा पर्याय निवडला गेल्याचे निदर्शनास आल्याने, आता संबंधित महिलांची क्षेत्रीय पातळीवर प्रत्यक्ष पडताळणी (Physical Verification) केली जाणार आहे.
महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासोबतच त्यांचे आरोग्य व पोषण सुधारण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी सर्व लाभार्थी महिलांना ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, ई-केवायसी करताना काही महिलांनी चुकून अयोग्य पर्याय निवडल्यामुळे त्यांच्या पात्रतेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर, योजनेच्या निकषांनुसार पात्र लाभार्थी निश्चित करण्यासाठी अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याचे निर्देश राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. ही पडताळणी लाभार्थी महिलांच्या निवासस्थानी किंवा क्षेत्रीय स्तरावर केली जाणार असून, यामुळे पात्र महिलांना योजनेचा लाभ अखंडितपणे मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती आपल्या समाज माध्यमांद्वारे दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, या प्रक्रियेचा उद्देश कोणत्याही लाभार्थीला त्रास देण्याचा नसून, योजनेतील पारदर्शकता आणि योग्य लाभार्थ्यांपर्यंत मदत पोहोचवणे हाच आहे.
दरम्यान, लाभार्थी महिलांनी पडताळणी प्रक्रियेदरम्यान आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत व अंगणवाडी सेविकांना सहकार्य करावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.










































































