Last Updated on 14 Feb 2026 4:37 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कारखाना इतिहासातील आजपर्यंतचे सर्वाधिक गाळप
सातारा ।
रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगाम २०२५–२०२६ मध्ये अभूतपूर्व कामगिरी करत इतिहासातील नवा गाळप विक्रम प्रस्थापित केला आहे. कारखान्याने १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ५ वाजेपर्यंत तब्बल १३ लाख ७२ हजार ०४९ मेट्रिक टन ऊस गाळप पूर्ण केले असून, ही कामगिरी अभिमानास्पद ठरली आहे. यापूर्वी हंगाम १९९५-१९९६ मध्ये कारखान्याने १३,७१,९०० मेट्रिक टन गाळप करून उल्लेखनीय नोंद केली होती; मात्र यंदा त्या विक्रमालाही मागे टाकत नव्या उच्चांकाची नोंद करण्यात आली आहे.
गेल्या ११ वर्षांपासून चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा कारखान्याने सातत्यपूर्ण प्रगती साधली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे कारखान्याचे व्यापक आधुनिकीकरण करण्यात आले असून, त्यातून प्रतिदिन गाळप क्षमता १२ हजार मेट्रिक टनांपर्यंत वाढविण्यात आली आहे. मिलिंग, साखर प्रक्रिया, सहवीजनिर्मिती, आसवनी व इथेनॉल प्रकल्पांमध्ये स्वयंचलित यंत्रणा बसविल्यामुळे उत्पादन कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ झाली आहे. या सुधारणांचा परिपाक म्हणूनच यंदाच्या हंगामात १३ लाख ७२ हजार मेट्रिक टन गाळपाचा ऐतिहासिक टप्पा यशस्वीरीत्या पार पडला आहे.
गतवर्षीप्रमाणे यंदाही योग्य नियोजन, शिस्तबद्ध ऊस तोडणी वाहतूक व्यवस्था आणि तांत्रिक अचूकतेच्या जोरावर गाळप हंगाम सुरळीत ठेवण्यात कारखान्याला यश आले आहे. सभासद शेतकऱ्यांकडून वेळेत व नियोजनबद्ध पद्धतीने ऊसपुरवठा होत असल्याने उत्पादन प्रक्रियेत कोणताही अडथळा निर्माण झाला नाही. कृष्णा कारखान्याने ऊस बेणेमळा, रोप निर्मिती कार्यक्रमांवर विशेष भर देत जयवंत आदर्श ऊस विकास योजना तसेच ‘फिल्ड स्टाफ आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना उत्पादनवाढीसाठी सातत्याने मार्गदर्शन केले जाते. ऊर्जा बचत, आर्थिक शिस्त आणि तांत्रिक नवकल्पना या गुणांमुळे कारखान्याला विविध पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे.











































































