Last Updated on 18 Feb 2026 8:24 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सातारा ।
य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारा कारखाना म्हणून महाराष्ट्रात ओळखला जात आहे. चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ सातत्याने विविध आधुनिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कारखान्यात एसआरएस (सल्फर रिमूव्हिंग सिस्टिम) प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे.
कारखाना कार्यस्थळावर उभारण्यात आलेल्या एसआरएस प्रकल्पाचे उद्घाटन चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संचालक लिंबाजी पाटील, दयानंद पाटील, संजय पाटील, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, शिवाजी पाटील, जे. डी. मोरे, विलास भंडारे, अविनाश खरात, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, वैभव जाखले, जनरल मॅनेजर (टेक्निकल) बालाजी पबसेटवार तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
या प्रणालीद्वारे सांडपाण्यावर अत्याधुनिक प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यात येणार आहे. एसआरएस प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन १० लाख लिटर इतकी आहे. प्रक्रिया केलेले पाणी प्रामुख्याने स्प्रे पाँडमध्ये वापरण्यात येईल. तसेच शेतीसाठी पाण्याची मागणी वाढल्यास, ईटीपी प्रक्रियेतून निर्धारित मानकांची पूर्तता करून हे पाणी शेतीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. पर्यावरण संवर्धनासोबतच पाण्याची बचत व शाश्वत वापर साध्य करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर कारखान्याने घेतलेला हा निर्णय दूरदृष्टीचा आहे.
पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा अवलंब करून सांडपाण्याचा पुनर्वापर करण्याचा हा उपक्रम कारखान्याच्या प्रगतिशील धोरणाचे द्योतक असून भविष्यातील जलसंकटावर मात करण्यासाठी तो दिशादर्शक ठरणार आहे.
डॉ. सुरेश भोसले
चेअरमन
कृष्णा कारखाना








































































