Last Updated on 13 Feb 2026 8:16 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सातारा ।
जयवंतराव भोसले कृष्णा कृषि महाविद्यालयाच्या दोन माजी विद्यार्थिनींनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या कृषि सेवा परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करत, अधिकारी पदावर आपली छाप उमटवली आहे.
महाविद्यालयाची माजी विद्यार्थीनी कु. मृदुला अर्जुन घाडगे यांची महाराष्ट्रातून ९ वा क्रमांक मिळवत कृषि उपसंचालक या पदावर निवड झाली आहे. तसेच, माजी विद्यार्थिनी कु. मयुरी सर्जेराव गायकवाड यांनी महाराष्ट्रातून २३ वा क्रमांक आणि SEBC प्रवर्गातून ४ था क्रमांक पटकावत तालुका कृषि अधिकारी पदाची संधी मिळविली आहे.
या दोन्ही विद्यार्थिनींच्या यशामुळे महाविद्यालयाचा नावलौकिक राज्यात उंचावला असून, सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे यश प्रेरणादायी ठरत आहे. स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण अभ्यास आणि आत्मविश्वास यांची जोड किती महत्त्वाची आहे, याचा प्रत्यय या निकालातून आला आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, व्हाईस चेअरमन जगदीश जगताप यांच्यासह सर्व संचालक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक फरांदे, सर्व प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी यांनी या यशस्वी विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन केले.








































































