Last Updated on 24 Jul 2023 8:11 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सातारा । कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे.महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेले कोयना धरणात एकूण पाणीसाठा 53.69 टीएमसी (51.01 टक्के) झाला असून कोयना धरणातील पाणीसाठ्याने रविवारी अर्धशतक गाठले.धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस पडत आहे.
कोयना धरणातील पाणीसाठ्यात मुसळधार पावसामुळे झपाट्याने वाढ होत आहे.गेल्या 24 तासांत कोयनानगर येथे 40 मिलिमीटर, नवजाला 50 मिलिमीटर आणि महाबळेश्वरला 54 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जलाशयात प्रतिसेकंद 59 हजार 977 क्युसेक पाण्याची आवक होत आहे.ही आकडेवारी 24 जुलै 2023 सायंकाळी 5 पर्यंतची आहे.
या धरणाची पाणी साठवण क्षमता 105.25 टीएमसी आहे.हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजूनही 51.56 टीएमसी पाण्याची गरज आहे.शनिवारी रात्री व रविवारी पावसाचा जोर कायम असल्याने त्यानंतरच्या 16 तासात धरणात सुमारे 15 टीएमसी पाण्याची आवक होऊन धरणाच्या शिवसागर जलाशयात 53.68 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे.
हेही वाचा – अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीत या गोष्टींची घ्या काळजी
बहे बंधाऱ्यावर पाणी

सांगली । कृष्णेच्या पाणलोट क्षेत्रातमोठ्याप्रमाणात पडत असलेल्या पावसामुळे कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ होत असून येथील बहे पुलानजिक असलेल्या बंधाऱ्यावर पाणी आले आहे.त्यामुळे रामलिंग बेटाकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे.कृष्णेच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन-चार दिवसापासून मोठ्याप्रमाणात पडत असलेल्या पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.बंधाऱ्यावर पाणी आल्याने बेटावर जाण्याचा मार्ग बंद झाला आहे.








































































