Last Updated on 20 Sep 2025 12:21 PM by Sanjay Patil/Adhorekhit
१०५ टीएमसी पाणीसाठा : धरणातून ६,४०० क्युसेक विसर्ग सुरु
सातारा । महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठा १०५ टीएमसी झाला आहे. धरण जवळपास शंभर टक्के भरले आहे. धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज, (२० सप्टेंबर) सकाळी कोयना धरणाचे चार वक्र दरवाजे १ फूट उघडून ६,४०० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी एवढी असून धरणातील पाणीसाठा १०५.१४ टीएमसी आहे. कोयना धरण जवळपास १०० टक्के भरले असून धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज सकाळी कोयना धरणाचे चार वक्र दरवाजे १ फूट उघडून ६,४०० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे २१०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये एकूण ८,५०० क्युसेक सुरू होईल.
कोयना नदी महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी आहे. याच नदीवर उभारण्यात आलेले कोयना धरण देखील महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी बनले आहे. महाबळेश्वर येथे उगम पावणाऱ्या कोयना नदीवर हे धरण बांधण्यात आले. कोयना धरण १०३ मीटर उंच आहे. १९५४ साली महाराष्ट्र सरकारने कोयना धरणाचे काम सुरु केले.१९६३ धरण बांधून पूर्ण झाले.१०३ मीटर उंच हे धरण ८०३ मीटर लांब आहे. कोयना धरणामुळे हजारो हेक्टर क्षेत्रफळ ओलिताखाली आले आहे. त्यामूळेच हा प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. १०५ टीएमसी म्हणजेच २९०० दशलक्ष घनमीटर पाणी साठवण्याची क्षमता कोयना धरणाची आहे.
कोयना धरणामुळे महाराष्ट्राची मोठ्या प्रमाणात झाली. पश्चिम महाराष्ट्रात भरभराट आली. कोयना धरणामुळे शेतीबरोबरच सातारा सांगली व कोल्हापूर येथील औद्योगिक क्षेत्राला पाणीपुरवठा होऊ लागला. कोयना धरण हे महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्पांपैकी एक महत्त्वाचे ठिकाण आहे. कोयना धरणावरील जलविद्युत प्रकल्पातून 1960 मेगावॅट इतक्या प्रचंड क्षमतेची वीज निर्मीती केली जाते.













































































