Last Updated on 05 Feb 2026 5:41 PM by Sanjay Patil/Adhorekhit
भाजप प्रवेशाच्या दाव्यावर जयंत पाटील यांचा घणाघात; नाव न घेता सदाभाऊ खोतांवर निशाणा
सांगली ।
आम्ही महाविकास आघाडीच्या राज्य सरकारच्या माध्यमातून २०२० साली केलेल्या कर्जमाफीमध्ये सांगली जिल्ह्यातील ८१ हजार शेतकऱ्यांना ४७३ कोटी रुपयांचा लाभ झाला आहे. आपण वाळवा जिल्हा परिषद मतदारसंघात गेल्या पाच वर्षात ८१ कोटी ८३ लाखाची विकास कामे केलेली आहेत,असा विश्वास माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी वाळवा येथील जाहीर सभेत बोलताना व्यक्त केला. ज्याने आतापर्यंत दहा पक्ष बदलले,तो मी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वक्तव्य करतो,हा मोठा विनोद असल्या चा टोलाही त्यांनी आ.सदाभाऊ खोत यांचे नांव न घेता दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वाळवा जिल्हा परिषदचे उमेदवार नेताजीराव पाटील, नवेखेड पंचायत समितीच्या उमेदवार वैशाली शेळके,पडवळवाडी पंचायत समितीच्या उमेदवार दिपाली थोरात यांच्या प्रचारार्थ या सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, राजारामबापू दुध संघाचे संचालक प्रशांत थोरात, उरुण ईश्वरपूरचे नगरसेवक संग्राम पाटील,माजी उपसरपंच हर्षवर्धन पाटील,उपसरपंच मिलिंद थोरात,माजी उपसरपंच चंद्रशेखर शेळके,सायली गोंदील,राजेंद्र औंधकर,नवेखेडचे माजी सरपंच प्रदीप पाटील, तुजारपूरचे माजी उपसरपंच संतोष पाटील,गाताडवाडीचे उपसरपंच संदीप करांडे व तिन्ही उमेदवार प्रामुख्याने उपस्थित होते.
आ. पाटील म्हणाले,भारत सरकारने अमेरिकेशी कृषी संदर्भात केलेला करार हा भारत देशातील शेती आणि शेतकरी उध्वस्त करणारा आहे. येत्या काही दिवसात त्याचे तपशील समोर येथील. मात्र या कराराच्या विरोधात देशातील शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय रहाणार नाही.
आम्ही एखाद्या विकास कामाचा नारळ फोडला, तर ते काम पूर्णच करतो. मात्र समोरची मंडळी नारळच फोडत सुटले आहेत,कामाचा पत्ताच नाही. आम्हाला जिल्ह्यात संधी मिळताच आपल्या पक्षाचा पाहिला स्विकृत सदस्य हा वाळव्याचे पै.किसन गावडे हे असतील.
नेताजीराव पाटील म्हणाले, मी कोणते आश्वासन देणार नाही,कोणावर टीका करणार नाही. कारण तो माझा स्वभाव नाही. मी वयाच्या १५ व्या वर्षांपासून गेली ४०-४५ वर्षे आपली सेवा करत आहे आणि भविष्यातही करत रहाणार आहे. आम्हा तिघांनाही मतरुपी आशिर्वाद द्यावा.
पै.किसन गावडे म्हणाले,माझ्या उमेदवारीचे काय झाले? याबद्दल चर्चा आहे. मात्र व्यक्तीपेक्षा पक्ष संघटना,नेतृत्व महत्वाचे आहे. बाबाकाका व आम्ही कित्येक वर्षांपासून एकत्र काम करतोय.
उरुण ईश्वरपूरचे नगरसेवक संग्राम पाटील म्हणाले,आमचे सर्व कुटुंब बाबाकाकांच्या पाठीशी आहे. एक आपला हक्काचा आणि कामाचा कार्यकर्ता अशी त्यांच्या ओळख आहे. आम्ही त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करू.
चंद्रशेखर शेळके म्हणाले,समोरच्या मंडळींचा साखर कारखाना खाजगी करण्याचा डाव आम्ही हाणून पाडला आहे. क्रांतिसिंह नागनाथआण्णा नायकवडी यांच्या विचारापासून दूर गेलेल्या या मंडळीना थारा देऊ नका. यावेळी महिला राष्ट्रवादी च्या जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव,वाळवाव्याचे उप सरपंच मिलिंद थोरात,धनाजी शिंदे,नवेखेडचे माजी सरपंच प्रदीप चव्हाण,गाताडवाडीचे उप सरपंच संदीप करांडे,तुजारपूरचे माजी उपसरपंच संतोष पाटील यांची ही भाषणे झाली.
प्रारंभी राजेंद्र औंधकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तर राजारामबापू दुध संघाचे संचालक प्रशांत थोरात यांनी आभार मानले. याप्रसंगी वाळव्याचे जालिंदर थोरात,वर्धमान मगदूम,नवेखेडचे माजी संचालक डी.बी.पाटील, रविंद्र चव्हाण,अहिरवाडीचे शशिकांत कदम,तसेच वाळवा व परिसरातील मान्यवर कार्यकर्ते,विविध संस्थांचे पदाधिकारी व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.














































































