Last Updated on 04 Dec 2021 6:00 PM by Sanjay Patil/Adhorekhit
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, भारताकडे 332 धावांची आघाडी, मयंक-पुजारा क्रीजवर
मुंबई ।
एजाज पटेलने संपूर्ण भारतीय संघाला बाद करत विश्वविक्रम रचला.मात्र,न्यूझीलंडला हा आनंद फार काळ साजरा करता आला नाही.भारतीय गोलंदाजांनी अवघ्या 62 धावांमध्ये न्यूझीलंडचा डाव गुंडाळला आणि भारतीय संघाने मुंबईत न्यूझीलंडचे वस्त्रहरण करत एजाजच्या विश्वविक्रमावर पाणी फेरले.
वानखेडे मैदानावर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी एका बाजूला न्यूझीलंडच्या एजाज पटेलने भारताच्या 10 विकेट घेऊन ऐतिहासिक अशी कामगिरी केली. तर दुसऱ्या बाजूला भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडचा पहिला डाव फक्त 62 धावांवर संपुष्टात आणला. भारताने पहिल्या डावात ३२५ धावा केल्या होत्या. उत्तरादाखल न्यूझीलंडला पहिल्या डावात फक्त 62 धावा करता आल्या. पहिल्या डावात भारताने तब्बल 263 धावांची आघाडी घेतली आहे.
न्यूझीलंडकडून काईल जेमिनसनने सर्वाधिक 17 धावांचे योगदान दिले. सलामीवीर टॉम लॅथमला 10 धावा जोडता आल्या. या दोघांपैकी कोणत्याही किवी फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. न्यूझीलंडचे 3 फलंदाज भोपळ्यावर माघारी परतले. दरम्यान, भारताकडून रवीचंद्नन अश्विनने सर्वात किफायतशीर गोलंदाजी केली. त्याने 8 षटकात 8 धावा देत 4 बळी घेतले.
तर मोहम्मद सिराज भारताचा दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 4 षटकात 19 धावा देत 3 बळी घेतले. तसेच अक्षर पटेलला 2 आणि जयंत यादवला एक विकेट मिळवता आली.
भारतातील सर्वात कमी धावसंख्या
न्यूझीलंडचा संघ पहिल्या डावात सर्वबाद 62 धावांवर आटोपला. भारताविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमधली ही किवी संघाची सर्वात कमी धावसंख्या होती. यापूर्वी 2002 मध्ये न्यूझीलंडचा संघ भारताविरुद्ध ९४ धावांत ऑलआऊट झाला होता. इतकेच नाही तर भारतीय भूमीवरील कसोटीतील ही सर्वात कमी धावसंख्या आहे. 1987 साली वेस्ट इंडिजविरुद्धच्या दिल्ली कसोटीत टीम इंडिया 75 धावांत ऑलआऊट झाली होती.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, भारताकडे 332 धावांची आघाडी
मुंबई कसोटीचा दुसरा दिवस खराब प्रकाशामुळे वेळेआधीच संपला.दुसऱ्या दिवशी भारताने पहिल्या डावात 325 धावा केल्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ अवघ्या 62 धावांत गारद झाला.भारतीय संघाने दुसऱ्या डावात 263 धावांची आघाडी घेऊन खेळण्यास सुरुवात केली आणि एकही विकेट न गमावता 69 धावा केल्या.मयंक अग्रवाल (38*) आणि चेतेश्वर पुजारा (29*) ही सलामीची जोडी क्रीझवर कायम आहे.त्यांची आघाडी 332 धावांपर्यंत वाढली आहे.










































































