Last Updated on 20 Apr 2026 7:51 AM by Sanjay Patil/Adhorekhit
ईश्वरपूर ।
बहे येथील श्री भैरवनाथ यात्रेला प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात सुरुवात झाली. अक्षय्य तृतीयेला सायंकाळी पाच वाजता पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला. पालखी मंदिरातून बाहेर येताच भाविकांनी ‘भैरोबाच्या नावानं चांगभलंऽऽ’चा गजर करत गुलाल-खोबऱ्याची उधळण केली. भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यात्रेनिमित्त श्री भैरवनाथ मंदिराला अतिशय आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. आज पहाटे देवाचे विधिवत पूजन, अभिषेक आणि महाआरती पार पडली. दुपारपासूनच परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सायंकाळी ५ वाजता पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला. पालखी मंदिरातून बाहेर येताच भाविकांनी गुलाल-खोबऱ्याची मुक्तपणे उधळण केली. बँजो, ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादात पालखीची मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली.
या सोहळ्यात गावचे सरपंच संतोष दमामे, उपसरपंच धनश्री थोरात यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, यात्रा कमिटीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गावातील प्रत्येक घरासमोर सुवासिनींनी पालखीचे पूजन केले. दुसऱ्या दिवशी सोमवार असल्याने मांसाहाराचे नियोजन मंगळवारी करण्यात आले आहे. दि. २४ रोजी तुफान हा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होणार आहे.












































































