Last Updated on 27 Oct 2022 10:55 PM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
थोडक्यात पण महत्वाचे
🌑 राज्यातील 7 हजार 649 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार
🌑 21 ऑक्टोबरला अंतिम मतदारयाद्या झाल्या प्रसिद्ध
🌑 ग्रामीण भागातील राजकारण तापू लागले
🌑 कोणत्याही क्षणी प्रत्यक्ष निवडणुकांचा कार्यक्रम सुरू होण्याची शक्यता
🌑 ग्रामीण भागात आता आमिषे अन् आश्वासनांचा पाऊस !
![]()
पुणे । राज्यात ग्रामपंचायतींचा प्रत्यक्ष निवडणुकांचा कार्यक्रम कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे.त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा धुरळा उडणार आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील राजकारण तापू लागले आहे.आधी ग्रामपंचायत की जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणूक हा संभ्रम होता.पण,ग्रामपंचायत निवडणूका आधी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.या निवडणुकीत थेट सरपंचपदाची निवडणूक होणार आहे.
राज्यातील 25 जिल्हा परिषदा, 23 महापालिका, 220 नगरपरिषदा व नगरपालिका आणि 284 पंचायत समित्यांची मुदत संपून आता सात महिने पूर्ण झाले आहेत.पण, प्रभागरचनेचा तिढा अजूनपर्यंत सुटलेला नाही.
राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून अंतिम निकालानंतर राज्य निवडणूक आयोग या निवडणुकांसंदर्भात निर्णय घेणार आहे.
त्याच दरम्यान,आता पुढील दीड महिन्यांत राज्यातील 7 हजार 649 ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे.त्याचबरोबर त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा धुरळा उडणार असे दिसते.राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदारयादीचा कार्यक्रम पूर्ण झाला आहे.21 ऑक्टोबरला अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध झाल्या आहेत.त्यामुळे आता कोणत्याही क्षणी प्रत्यक्ष निवडणुकांचा कार्यक्रम सुरू होण्याची शक्यता आहे.त्यामुळे गावपुढारी आणि त्यांचे कार्यकर्ते आतापासूनच कामाला लागले आहेत.गावपुढाऱ्यांचे बगलबच्चे तर कट्ट्यावरील गप्पात गेल्या पाच वर्षात केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडताना दिसत आहेत.स्थानिक पुढाऱ्यांनी ही जबाबदारी आपल्या खास मर्जीतील कार्यकर्त्यांवर सोपवली आहे.
महापुरात केलेले काम असेल,शासकीय योजनांचा लाभ असेल,व्यक्तिगत लाभाच्या योजना असतील,विविध विकासकामे असतील अशा कामांचा पाढा वाचणारे कार्यकर्ते सध्या चौका-चौकात दिसत आहेत.त्याचबरोबर महापूरातील कमाईच्या सुरस कथा आजही काही ठिकाणी सुरू असतात हा भाग वेगळा ! तर विरोधी मंडळी सत्ताधाऱ्यांनी केलेले महापुरातील राजकारण,कथित भ्रष्टाचार,लोकांची केलेली अडवणूक याची माहिती देताना दिसत आहेत.
निवडणुकांच्या तोंडावर आमिषे आणि आश्वासनांचा पाऊस पडायला सुरवात झाली आहे.आतापासूनच नोकरी तसेच कर्जाच्या आमिषांचे पेव फुटले आहे.निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येईल तसातसा ‘आश्वासनांचा मुसळधार पाऊस’ पडायला सुरवात होणार आहे.त्याचबरोबर सुशिक्षित बेरोजगार युवकांना हेरून त्यांना नोकरीचे आमिष दाखविण्याचे प्रकारही सुरू झाले आहेत.त्याद्वारे किती युवकांना नोकऱ्या लागतात हा भाग वेगळा.पण, त्याआधारे युवकांना झुलवत ठेवण्याचा काहींचा हातखंडा असतो.संस्थांमध्ये तसेच शासकीय नोकरीचेही आमिष दाखविण्यात येत आहे.
ग्रामीण राजकारण अडकले घर-वाडा,भावकीत
काही गावांमध्ये प्रस्थापितांविरोधात युवावर्ग नाराज असल्याचेही चित्र आहे.त्यामुळे काही ठिकाणी नव्या आघाड्या होण्याचे संकेत मिळत आहेत.काही गावांमध्ये सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर नाराजीचा सूर आहे.भ्रष्टाचाराची काही प्रकरणे चर्चेत आहेत.काही ठिकाणी गेली अनेक वर्षे तेच ते गट एकमेकांविरुद्ध लढताना दिसत आहेत.त्यामुळे ठराविक लोकांना पुन्हा-पुन्हा संधी मिळत आहे.गावाच्या विकासाला प्राधान्य मिळण्याऐवजी घर-वाडा आणि भावकीच्या राजकारणामुळे अनेक ठिकाणी गावाच्या विकासाला खो बसत असल्याचे चित्र आहे.
![]()









































































