Last Updated on 13 Feb 2026 9:39 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कोल्हापूर ।
राज्यातील साखर कारखान्यामध्ये आमदार खासदार स्थानिक विकास कार्यक्रमातून किंवा प्रत्येक साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतक-यांच्याकडून वजनकाटा बसविण्याच्या झालेल्या खर्चाच्या किमतीएवढी रक्कम गाळप झालेल्या ऊसातून कपात करून तातडीने शासकीय वजनकाटे बसविण्याच्या सुचना साखर आयुक्त संजय कोलते यांनी वैद्यमापन विभागाच्या नियंत्रकांना दिली असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली.
राज्यातील साखर कारखान्यामध्ये सर्रास काटामारी व रिकव्हरी चोरी करून ऊस उत्पादक शेतक-यांची लुबाडणूक केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्टपणे भूमिका मांडून राज्यातील साखर कारखाने काटामारी करत असल्याची माहिती दिली आहे. चालू गळीत हंगामात कर सरासरी एकुण गाळप झालेल्या ऊसाच्या १० टक्के वजनात घट आलेली आहे. काटमारी बरोबर रिकव्हरी चोरी करण्याचे प्रमाणही वाढल्याने ऊस उत्पादक शेतकरी , वाहतूकदार व ऊस तोडणी मजूर दुहेरी संकटात सापडले आहेत. यामुळे राज्यातील सर्व साखर कारखान्याच्या बाहेर राज्य सरकारने संबधित जिल्ह्यातील जिल्हाधिकारी , साखर सहसंचालक, उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक, वजनमापे नियंत्रक यांच्या नियंत्रणात वजनकाटा उभारण्याची मागणी करण्यात आलेली आहे.
सदर वजनकाटा उभा करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा याकरिता आमदार खासदार स्थानिक विकास कार्यक्रम किंवा शासनाकडे पैसे उपलब्ध नसतील तर संबंधित कारखान्याच्या गाळप झालेल्या ऊसातून वजनकाट्याच्या खर्चाची रक्कम शेतक-यांकडून प्रतिटनाप्रमाणे कपात करून घेण्याची तरतूद करण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनी केली आहे.राज्यातील प्रत्येक साखर कारखान्यामध्ये राज्य सरकारचे वजनकाटे बसविले जातील व सदर वजनकाटे डिजीटल व ॲानलाईन प्रणालीने शासनाच्या मुख्य सर्व्हरला जोडण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे.
चालू वर्षी काटामारी व रिकव्हरी चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून शेतक-यांना यंदा याचा मोठा फटका बसलेला आहे. यामुळे राज्यातील प्रत्येक साखर कारखान्याच्या झालेल्या ऊस गाळप हंगामातील ५०० टनापेक्षा जादा ऊस तोडणी झालेल्या ऊस उत्पादक शेतक-यांची व वाहतूकदारांची यादी गावनिहाय प्रसिद्ध करण्याची सुचना साखर सहसंचालक यांना देण्यात आली आहे.








































































