Last Updated on 09 Jan 2026 6:44 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कोल्हापूर | निवडणूक आयोगाने दिनांक 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारीत पुणे विभाग, पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार नोंदणीचा कार्यक्रम घोषित केला आहे. पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी निश्चित करण्यात आलेल्या सर्व मतदान केंद्रावर (विनिर्दिष्ट ठिकाणी) दर्शनी भागात 12 जानेवारी रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे.
पदवीधर व शिक्षक मतदारसंघाकरिता अनुक्रमे 18 व 19 नमुन्यात अर्ज सादर करावयाचे होते. या कार्यक्रमातंर्गत दिनांक 6 नोव्हेंबर पर्यंत प्राप्त झालेल्या ऑफलाईन व ऑनलाईन अर्जावर अंतिम निर्णय घेऊन 3 डिसेंबर रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली होती. प्रसिध्द केलेल्या यादीवर दावे व हरकती दाखल करण्यासाठी 3 ते 18 डिसेंबर हा कालावधी देण्यात होता. त्यानुसार प्राप्त झालेल्या 12 हरकतीवर योग्य निर्णय घेऊन हरकती निकाली काढण्यात आल्या आहेत. 7 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यात पदवीधरसाठी 17 हजार 113 व शिक्षकसाठी 2 हजार 30 इतके अर्ज प्राप्त झाले आहेत. या सर्व अर्जावर 5 जानेवारी पर्यंत अंतिम निर्णय घेऊन अंतिम मतदार यादी तहसिल कार्यालय, सहा. मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय तसेच सन 2020 मधील निवडणुकावेळी पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी निश्चित करण्यात आलेल्या सर्व मतदान केंद्रावर (विनिर्दिष्ट ठिकाणी) दर्शनी भागात 12 जानेवारी रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे.
12 जानेवारी रोजी प्रसिध्द होणा-या अंतिम मतदार यादीचे सर्व राजकीय पक्षांनी व सर्व मतदारांनी बारकाईने निरीक्षण करुन आपली व आपल्या सबंधित व्यक्तींची नावे, सर्व मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट झाली आहेत किंवा नाहीत याची खात्री करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी, पदवीधर व शिक्षक मतदारसंघ पुणे विभाग पुणे यांनी केले.














































































