Last Updated on 13 Feb 2026 10:30 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषीचा दर्जा – मंत्री पंकजा मुंडे
महा पशुधन एक्स्पो २०२६ चे परळीत उद्घाटन,
३८ एकर क्षेत्रात विविध स्टॉलची मांडणी
बीड ।
पशुपालनास कृषीचा दर्जा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे कृषीच्या दराने कर्ज पुरवठा करण्यासोबत पशुपालनासाठी 50 टक्के अनुदानदेखील दिले जाणार असल्याचे या क्षेत्रात मोठया प्रमाणात ग्रामीण उद्योजक तयार होतील. यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन पशुसंवर्धन तथा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी परळी येथील ‘महा पशुधन एक्सपो 2026’ च्या उद्घाटन प्रसंगी केले.
परळी येथील अंबाजोगाई मार्गालगत असणाऱ्या ओपळे मैदान येथे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. 38 एकर मैदानात होणारे हे प्रदर्शन 15 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. यावेळी आमदार धनंजय मुंडे, पशुसंवर्धन सचिव डॉ. एन. रामास्वामी, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, पशुसंवर्धन आयुक्त प्रविण देवरे तसेच परळीच्या नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मान्यवरांच्य हस्ते गोपूजन व दीपप्रज्वलन झाले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन तसेच दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यात आले. या ठिकाणी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ एक स्वतंत्र दालन देखील उभारण्यात आले आहे.
पशुपालन हा व्यवसाय उद्योगात रुपांतरीत व्हावा यासाठी शासन पुढाकार घेत असून, विभागाचा कार्यभार स्वीकारल्यावर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने बारामतीसोबत परळी येथील पशु महाविद्यालय मंजूर करुन घेतले. असे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.
पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या पशू प्रदर्शनात देशातील विविध भागातील पशुधन येथे पाहण्यासाठी उपलब्ध आहे. या ठिकाणी देशातली सर्वात छोटी गाय तसेच विविध प्रजातींच्या गायी, बैल, घोडे आणि बकरे यांच्यासह विविध पक्षी विस्तीर्ण दालनांमध्ये आहेत. पशुपालन तंत्रात आलेले नवे बदल तसेच उत्पादकता वाढवणारी आणि पशुंवर उपचार करणारी औषधही या ठिकाणी उपलब्ध आहेत. या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची मार्गदर्शपर व्याख्याने होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी प्रदर्शनाची पाहणी करण्यासाठी येत असल्याचेही पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.








































































