Last Updated on 13 Mar 2026 8:11 PM by Sanjay Patil/Adhorekhit
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती
सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी उपस्थित केली होती लक्षवेधी सूचना
मुंबई ।
सातारा जिल्ह्यातील दक्षिण मांड खोऱ्यातील दुष्काळग्रस्त भागाला दिलासा देण्यासाठी राबविण्यात येत असलेली वाकुर्डे उपसा सिंचन योजना लवकरच सौर ऊर्जेवर आणण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत दिली. या निर्णयामुळे विजेवरील खर्चात बचत होऊन सिंचन व्यवस्थापन अधिक कार्यक्षम होणार आहे. या विषयाची लक्षवेधी सूचना विधानसभा सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी उपस्थित केली होती.
मंत्री विखे पाटील म्हणाले की, सातारा जिल्ह्यातील दक्षिण मांड खोऱ्याचे एकूण क्षेत्रफळ सुमारे ६६८७ चौ. कि.मी. असून त्यापैकी जलसंपदा विभागाच्या १३०९ चौ. कि.मी. क्षेत्रास विविध योजनांद्वारे सिंचनाचा लाभ दिला जात आहे. कराड तालुक्यातील दक्षिण मांड नदी खोऱ्यातील उंच व डोंगराळ भाग अवर्षणप्रवण असल्याने या भागासाठी वाकुर्डे उपसा सिंचन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत १९ गावांतील सुमारे २२०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट आहे.
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या नियमांनुसार पाण्याचे आकारणी दर निश्चित करण्यात आले असून वीज, देखभाल व परिचालन खर्च लक्षात घेऊन पाणीपट्टी आकारली जाते. शासनाने १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व उच्चदाब व अतिउच्चदाब उपसा जलसिंचन योजनांचे सुमारे १०५३ मेगावॅट सौर ऊर्जाकरण करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार वाकुर्डे उपसा सिंचन योजनेलाही सौर ऊर्जेवर आणण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.












































































