Last Updated on 26 Jan 2022 12:13 AM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली ।
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 2022 मधील पद्म पुरस्कारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.यात सायरस पूनावाला,बालाजी तांबे,प्रभा अत्रे,राधेश्याम खेमका,दिवंगत सीडीएस जनरल बिपीन रावत,कल्याण सिंग,सोनू निगम,सुलोचना चव्हाण,डॉ. हिम्मतरावर बावस्कर आदींचा सन्मान करण्यात आला आहे. त्याचबरोबर सीडीएस जनरल बिपीन रावत यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.भारताच्या राष्ट्रपतींनी यावर्षी 128 पद्म पुरस्कारांना मान्यता दिली आहे. या १२८ जणांच्या यादीत महाराष्ट्रातील १० जणांचा समावेश आहे.
पद्म पुरस्कार हे भारत सरकारकडून देण्यात येणाऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी पुरस्कार आहेत. या पुरस्काराची घोषणा केंद्रीय गृहमंत्रालयाकडून केली जाते. दरवर्षी मार्च वा एप्रिल या महिन्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. त्यात राष्ट्रपतींची स्वाक्षरी असलेले पुरस्कारपत्र (सनद) तसेच एक पदक यांचा समावेश असतो.
यावर्षी एकूण १२८ पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये ४ ‘पद्मविभूषण’, १७ ‘पद्मभूषण’ आणि १०७ ‘पद्मश्री’ पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कार घोषित झालेल्या मान्यवरांमध्ये ३४ महिलांचा समावेश आहे. १० अप्रवासी भारतीयांना हे मानाचे पुरस्कार जाहीर झाले असून १३ मान्यवरांना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत.
महाराष्ट्रातील ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित
![]()
प्रभा अत्रे या देशातील शास्त्रीय संगीतातील एक अग्रगण्य गायिका म्हणून ओळखल्या जातात. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यात प्रभा अत्रे यांना पद्म विभूषण जाहीर करण्यात आला आहे.हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील एक अग्रगण्य गायिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभा अत्रे या किराणा घराण्याच्या गायिका आहेत. त्यांचा जन्म १३ सप्टेंबर १९३२ रोजी झाला. प्रसिद्ध असे पंडित सुरेशबाबू माने आणि गानहिरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिराबाई बडोदेकर यांच्या त्या शिष्या आहेत.प्रभा अत्रे या जगभरात प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका व विदुषी परिचित आहेत. त्यांचे ख्याल गायकीसह ठुमरी, दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, भजन व भावसंगीत गायकीवरही प्रचंड असे प्रभुत्व आहे. भारतीय शास्त्रीय संगीत जगभर पोहोचवण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. प्रभा अत्रे या त्यांच्या अनेक कार्यक्रमांमध्ये अनेकदा स्वरचित बंदिशी सादर करतात. प्रभा अत्रे यांच्या काही रचना, जसे, मारू बिहाग रागातील ‘जागू मैं सारी रैना’, कलावती रागातील ‘तन मन धन’, किरवाणी रागातील ‘नंद नंदन’, ह्या मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झालेल्या आहेत.
पद्मविभूषण पुरस्कार
प्रभा अत्रे (कला), बिपीन रावत (मरणोत्तर), कल्याण सिंह (मरणोत्तर) आणि राधेश्याम खेमका(मरणोत्तर)
पद्मभूषण पुरस्कार
सायरस पुनावाला (व्यापार आणि उद्योग) , नटराजन चंद्रशेखरन (व्यापार आणि उद्योग), सत्या नाडेला, सुंदर पिचई, काँग्रेस नेते गुलामनबी आझाद
महाराष्ट्रातील पद्मश्री पुरस्कारार्थी
वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. भीमसेन सिंघल, डॉ. हिम्मतराव बाविस्कर व डॉ. विजयकुमार विनायक डोंगरे, कला क्षेत्रातील योगदानाबाबत सुलोचना चव्हाण तसेच प्रसिद्ध गायक सोनू निगम, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदानाबाबत अनिल कुमार राजवंशी यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबाबत बालाजी तांबे यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
चार भारतीय वंशाच्या व्यक्तींना पुरस्कार
मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला आणि गुगलचे प्रमुख सुंदर पिचाई यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्याचसोबत ब्रिटनचे नागरिक परंतु भारतीय वंशाच्या डॉ. प्रोकर दासगुप्ता आणि आयर्लंडच्या रुतगेर कॉर्टनहस्ट यांचाही पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.
पद्म पुरस्कार यादी २०२२
महाराष्ट्राला १० पद्म पुरस्कार; महाराष्ट्र ठरला एक पद्मविभूषण तर दोन पद्मभूषणचा मानकरी
प्रतिभावंत गायिका प्रभा अत्रे यांना ‘पद्मविभूषण’ तर प्रसिध्द उद्योजक नटराजन चंद्रशेखरन आणि सायरस पुनावाला यांना ‘पद्मभूषण पुरस्कार’ जाहीर झाला.आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांना मरणोत्तर ‘पद्मश्री पुरस्कार’ जाहीर झाला असून त्यांच्यासह राज्यातील अन्य सहा मान्यवरांना ‘पद्मश्री पुरस्कार’ जाहीर झाले आहेत.
यावर्षी एकूण ४ मान्यवरांना ‘पद्मविभूषण पुरस्कार’ जाहीर झाले असून महाराष्ट्रातून प्रतिभावंत गायिका,संगित रचनाकार,लेखिका,प्राध्यापिका आणि विदुषी प्रभा अत्रे यांना कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच, प्रसिध्द उद्योजक नटराजन चंद्रशेखरन आणि सायरस पुनावाला यांना उद्योग व व्यापार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी ‘पद्मभूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. देशातील एकूण १७ मान्यवरांना ‘पद्मभूषण पुरस्कार’ जाहीर झाले आहेत.

सात मान्यवरांना ‘पद्मश्री पुरस्कार’
प्रसिध्द आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांना वैद्यकीय क्षेत्रातील बहुमूल्य योगदानासाठी मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. यासोबतच डॉ. भिमसेन सिंघल, डॉ. विजयकुमार डोंगरे आणि डॉ. हिंमतराव बावस्कर यांना वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. कला क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदानासाठी ज्येष्ठ लावणी गायिका व पार्श्वगीत गायिका सुलोचना चव्हाण आणि प्रसिध्द पार्श्व गायक सोनू निगम यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी अनिलकुमार राजवंशी यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.













































































