Last Updated on 05 Nov 2023 8:19 PM by Sanjay Patil/Adhorekhit
वर्धा |
देवळी येथून वर्ध्याला येत असताना मोटारीवरील नियंत्रण सुटल्याने सेलसुरा जवळील नदीच्या पुलावरून मोटार खाली कोसळली.यामध्ये मेडिकल कॉलेजच्या सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.जवळपास 40 फूट पुलावरून चारचाकी वाहन खाली पडल्याने भीषण अपघात झाला आहे.रात्री एकच्या सुमारास हा अपघात झाला आहे.दरम्यान,वर्धा जिल्ह्यातील सेलसुरा जवळ मोटार नदीत कोसळून झालेल्या दुर्दैवी अपघातातील मृतांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे.
मृतांमध्ये सर्वच जवळपास २५ ते ३५ वयोगटातील आहेत.वर्धा-देवळी या मार्गावरील सेलसुरा येथील दुभाजकला धडकून झायलो गाडी पुलावरून खाली कोसळली. त्यात गाडीतील 7 विद्यार्थी गतप्राण झाले. अपघात इतका भीषण होता की गाडीतील सर्व साहित्याचा चेंदामेंदा झाला आहे. विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक चालकास या बाबत माहिती मिळाली. त्याने वर्धेकडे सलोडला येताना सावंगी पोलिसांना यासंदर्भातील माहिती दिली. रात्री वर्ध्याला परत येत असताना त्यांची मोटार नदीत कोसळली. या अपघातात त्याच्यासह सातही मित्रांच्या दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच वर्ध्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी पियुष जगताप, सावंगी पोलिस निरीक्षक घटनास्थळी तातडीने दाखल झाले आहे. सातही मेघे वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
वर्धा जिल्ह्यातील सेलसुरा अपघातातील मृतांबाबत मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त
मुंबई |
वर्धा जिल्ह्यातील सेलसुरा जवळ मोटार नदीत कोसळून झालेल्या दुर्दैवी अपघातातील मृतांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना प्रकट केली आहे.मृतांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या तरुणांचा समावेश होता. अशा होतकरू तरुणांचा मृत्यू दुर्दैवी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मोठा आघात असल्याचे नमूद करून, मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी सहवेदनाही प्रकट केली आहे.
वर्धा जिल्ह्यातील सेलसुरा येथे कार दुर्घटनेतील वैद्यकीय विद्यार्थ्यांचा मृत्यू दुर्दैवी, क्लेशदायक – उपमुख्यमंत्री अजित पवार
वर्धा जिल्ह्याच्या सेलसुरा येथे कार नदीत कोसळून सात वैद्यकीय विद्यार्थ्यांचा झालेला मृत्यू दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कार दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असल्याचे सांगत उपमुख्यमंत्र्यांनी मृत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.











































































