Last Updated on 13 Jan 2022 7:00 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कोरोनाच्या आव्हानावर मात करून आरोग्याचा गोडवा वाढवूया-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई |
मकर संक्रांत आपल्याला संक्रमण आणि बदल स्वीकारण्याचा संदेश देते. त्यासाठी आपण परस्परांची काळजी घेत कोरोनाच्या आव्हानात्मक परिस्थितीवर मात करूया आणि या संक्रमणातून बाहेर पडून आरोग्याचा गोडवा वाढवूया, अशा शुभेच्छा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला राज्यातील जनतेला दिल्या आहेत.
मुख्यमंत्री म्हणतात की , पृथ्वी आणि सूर्याचं हे नातं आपल्याला संक्रमणाला सामोरे जाण्यास शिकवते. जगावर गेले दोन वर्षे कोरोना विषाणूचे संकट घोंगावते आहे. यातही आपण संसर्गाची साखळी तोडण्याचा प्रयत्न करत पुढे जात आहोत. उद्या साजऱ्या होणाऱ्या मकर संक्रांतीकडूनही आपण हाच संदेश घेऊया. परस्परांची काळजी घेऊया. गर्दी टाळूया. एकमेकाला आरोग्यदायी, समृद्ध जीवनासाठी शुभेच्छा देऊया. सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ‘मकर संक्रांती’च्या शुभेच्छा

“सूर्याच्या मकर राशीतील प्रवेशाने साजरा होणारा मकर संक्रांतीचा सण आणि सुरु होणारे सूर्याचे उत्तरायण राज्यातील जनतेच्या जीवनात धन, धान्य, उत्तम आरोग्य, आनंदाची समृद्धी घेऊन येवो. समाजातील अज्ञान, असत्य, अंधश्रद्धेचा अंध:कार यानिमित्ताने दूर होवो. मनातील, विचारातील कटुता संपून परस्परांमध्ये स्नेह, मैत्री, आपुलकी, बंधुत्वाची भावना वाढीस लागो. यंदाची मकर संक्रात राज्यासाठी कोरोनामुक्तीची पहाट ठरो.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, मकर संक्रांतीच्या दिवशीच पोंगल, बिहू आणि उत्तरायण पर्व हे सणही आज साजरे केले जात आहेत. पारंपरिक पद्धतीनं साजरा होत असलेल्या या सणांच्याही सर्वांना शुभेच्छा. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर नववर्षाच्या सुरुवातीलाच साजरे होत असलेले हे सण कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करुन साजरे करण्याचं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.












































































