देशात आतापर्यंत 12 जणांना ओमिक्रॉन;कर्नाटक,गुजरात,महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये ओमिक्रॉन रुग्ण
महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा धोका वाढला
मुंबई ।
महाराष्ट्राची काळजी वाढवणारी आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे नवे 7 रुग्ण आढळून आले आहेत.राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने सांगितले की, ओमिक्रॉन बाधितांची संख्या आठ झाली आहे.देशात आतापर्यंत कर्नाटक,गुजरात,महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये कोरोनाचे ओमिक्रॉन रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्राव्यतिरिक्त कर्नाटकात दोन,गुजरात आणि दिल्लीत प्रत्येकी एक ओमिक्रॉन संक्रमित आढळले आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्ये सहा,तर पुण्यात ओमिक्रॉन व्हेरियंटचा एक रुग्ण आढळला आहे.त्यामुळे महाराष्ट्रातील ओमिक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णाची संख्या आता आठ झाली आहे.पिंपरी-चिंचवडमध्ये 6 तर पुण्यात 1 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ माजली आहे.
पिंपरी चिंचवडणद्ये आढळलेल्या 6 पैकी 3 जण नायजेरियामधून आल्याची माहिती आहे. यामध्ये 44 वर्षीय भारतीय वंशाची नायजेरियन नागरिक महिला आणि तिच्या 12 आणि 18 वर्षे वयाच्या दोन मुलींचा समावेश आहे. ही महिला 24 नोव्हेंबर रोजी नायजेरियातील लेगास देशातून आपल्या दोन्ही मुलींसह पिंपरी-चिंचवडमध्ये तिच्या भावाला भेटण्यासाठी आली होती. जीनोम सिक्वेन्सिंग रिपोर्टमध्ये या तिघींचा रिपोर्ट ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आला आहे.याशिवाय आणखी तीन जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. नायजेरियातून आलेल्या या तिघींच्या जवळच्या व्यक्तींपैकी 13 जणांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 45 वर्षांचा भाऊ, दीड वर्षे आणि 7 वर्षांच्या दोन मुलींना देखील ओमायक्रॉनची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. या 6 रुग्णांपैकी 3 जण हे 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत आणि त्यांनी कोरोनाची कोणतीही लस घेतलेली नाही हे उघड आहे.
सातवा रुग्ण पुण्यात आढळून आला आहे.पुण्यातील 47 वर्षीय तरुण 18 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर या कालावधीत फिनलंडमध्ये होता. 29 तारखेला हलका ताप आल्यानंतर त्याने स्वतःची आरटीपीसीआर चाचणी केली तेव्हा त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. या व्यक्तीने लसीचे दोन्ही डोस घेतले होते. सध्या या व्यक्तीमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नसून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यात ओमिक्रॉन रुग्णांची संख्या 8 वर
काल कल्याण-डोंबिवलीत 1 रुग्ण आढळला होता,त्यानंतर प्रशासन अलर्ट मोडवर आले होते.त्यानंतर आता पिंपरी-चिंचवडमध्ये 5 तर पुण्यात 1 नवा ओमिक्रॉनचा रुग्ण आढळल्याने प्रशासनाची डोकेदुखी खूप वाढली आहे.महाराष्ट्रात ओमिक्रोनचा प्रसार वेगाने होत असल्याने आता देशाची चिंताही वाढली आहे.