पंढरपूर |
कार्तिकी एकादशीनिमित्त आज पहाटे श्री विठ्ठल- रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आली. पहाटे तीनच्या सुमारास पार पडली.त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.त्यांच्यासोबत वारकरी प्रतिनिधी म्हणून श्री विठ्ठल रुक्मिणीमातेची महापूजा करण्याचा मान नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील कोंडिबा टोणगे आणि त्यांच्या पत्नी प्रयागबाइ टोणगे यांना मिळाला.
चौखांबी येथे संकल्प सोडून अजित पवारांच्या हस्ते पहाटे दोन वाजून पंधरा मिनिटांनी विठूरायाची षोडशोपचारे पूजा पार पडली. यानंतर तीन वाजता रुक्मिणी मातेची पूजा झाली. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने श्री. पवार आणि सौ.पवार यांचा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जि. प.अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, सौ. सारिका भरणे, मानाचे वारकरी श्री. कोंडीबा देवराव टोणगे, सौ. प्रयागबाई कोंडीबा टोणगे, आमदार समाधान आवताडे, नगराध्यक्षा सौ. साधना भोसले आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्यावर कृपादृष्टी कायम ठेवून राज्याची भरभराट करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे श्री विठ्ठलाच्या चरणी साकडे
महाराष्ट्र राज्यावर कृपादृष्टी कायम ठेवून राज्याची भरभराट करावी व राज्यातील शेतकरी व कष्टकरी यांना यश द्यावे. राज्यातील प्रत्येकाच्या घरात धनधान्य, सुख-शांती व समृद्धी नांदावी. राज्य, देश आणि जगातील कोरोनाचे संकट कायमचे दूर व्हावे, तसेच सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहण्याची महाराष्ट्राची परंपरा कायम रहावी, असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्री विठ्ठल चरणी घातले.
मंदिर समितीच्या मागण्यांबाबत सकारात्मक
विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीने मंदिर विकासाच्या आराखड्यासह विविध मागण्या केलेल्या आहेत. त्याबाबत शासन सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली. ते म्हणाले, मंदिर परिसर विकासासाठी केंद्राकडून मदत मिळण्याबाबतही प्रयत्न करण्यात येतील. तसेच पालखी महामार्गाच्या कामात राज्य शासन केंद्राला सहकार्य करणार आहे.
या वर्षीच्या कार्तिकी वारीस एसटी संपामुळे वारकऱ्यांची संख्या कमी आहे असे नमूद करून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर राज्य शासनाकडून सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रारंभी मानाचे वारकरी श्री.कोंडीबा टोणगे, सौ. प्रयागबाई कोंडीबा टोणगे(मु. निळा, पो. सोनखेड, ता. लोहा, जि. नांदेड) यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर श्री व सौ टोणगे यांना राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने देण्यात येणारा प्रवास सवलत पास श्री. पवार यांनी सुपूर्द केला. शासकीय महापूजा संपल्यानंतर तात्काळ श्री.विठ्ठल दर्शनास सुरुवात झाली.
यावेळी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी,पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संभाजी शिंदे, अतुलशास्त्री भगरे, शकुंतला नडगिरे, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, पोलीस उप अधीक्षक विक्रम कदम, तहसिलदार सुशील बेल्हेकर, मुख्याधिकारी अरविंद माळी,व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक विलास राठोड आदी उपस्थित होते.
श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या गर्भगृह फुलांनी बहरला
आज कार्तिक एकादशी असल्याने श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या गर्भगृहात झेंडु,शेवंती,कार्नेशियन,गुलाब अशा विविध पंधरा प्रकारच्या पाना फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे या सजावटीसाठी वेगवेगळ्या पाच टन फुलांचा वापर करण्यात आला असुन ही सजावट पुणे येथील विठ्ठल भक्त राम जामभुळकर यानी केली आहे ..श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचा गाभारा झेंडूच्या फुलासह विविध आकर्षक पाना फुलानि सजवण्यात आला आहे तसेच सोळखांबी,सभामंडप अशा मंदिराच्या विविध भागाना देखील देशी विदेशी फुलांची सजावट करण्यात आली आहे.