Last Updated on 13 Nov 2021 11:39 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई |
एसटी महामंडळ शासनामध्ये विलीन करण्यासाठी गेले काही दिवस संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी मोठा दिलासा दिला आहे.
एसटी कामगारांच्या भावना लक्षात घेऊन त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याच्या मागणीचा अभ्यास करून शासन सकारात्मक निर्णय घेईल. तसेच विलिनीकरणासंदर्भात नेमण्यात आलेल्या समितीला आपला अहवाल लवकर देण्याबाबत सांगण्यात येईल, असे आश्वासन परब यांनी संपकरी एसटी कामगारांच्या शिष्टमंडळाला आज दिले.
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर, रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी आज अनिल परब सह्याद्री अतिथीगृह यांची भेट घेतली. यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, वित्त सल्लागार तथा मुख्य लेखाधिकारी मंदार पोहरे उपस्थित होते. तर कामगारांच्या शिष्टमंडळात सविता पवार, दिलीप घोडके, शरद कोष्टे, विनित फडके, सतीश मेटकरी आदी कर्मचाऱ्यांचा समावेश होता. यावेळी पडळकर, खोत यांच्यासह कामगारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.दरम्यान, शिष्टमंडळाला दिलेल्या आश्वासनावर आमदार गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांनीही समाधान व्यक्त केले.
या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना परब म्हणाले, कामगार संघटनांच्या मागण्यांनुसार एसटीच्या कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता व घरभाडे भत्ता वाढवून दिला आहे. फक्त वेतनवाढीसंदर्भात दिवाळीनंतर चर्चा करू असे सांगितले होते, असे सांगतानाच संपामुळे एसटी अडचणीत आली आहे. एसटीची सेवा तोट्यामध्ये चालवण्याची महामंडळाची इच्छा नाही. त्यासाठी उत्पन्नाचा स्त्रोत वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहोत, यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबित आहोत.
मंत्री अनिल परब यांनी घेतली शरद पवारांची भेट
दरम्यान,महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे राज्यातील सर्व 250 बस डेपो बंद आहेत.शनिवारी सकाळी परिवहनमंत्री अनिल परब यांनी शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये साधारण 10 मिनिटांची भेट झाली.या भेटीत हा संप कसा मिटवता येईल याबाबत महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती आहे.











































































