Last Updated on 29 Sep 2026 6:55 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । सांगली जिल्ह्यातील वाळवा, शिराळा, खानापूर, तासगाव, कडेगाव आणि पलूस या सहा तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करावा, या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली.
राज्य शासनाने सप्टेंबर २०२६ मध्ये जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत सांगली जिल्ह्यातील मिरज, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि जत या चार तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, जिल्ह्यातील वाळवा, शिराळा, खानापूर, तासगाव, कडेगाव आणि पलूस या तालुक्यांमध्येही पावसाअभावी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
विशेषतः वाळवा व शिराळा तालुक्यांसह इतर संबंधित तालुक्यांमध्ये पावसाचा मोठा खंड पडल्याने खरीप हंगामातील ज्वारी, भात, हळद, ऊस, द्राक्षे, सोयाबीन तसेच इतर पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी पिकांची वाढ खुंटली असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. पावसाच्या खंडामुळे काही भागांत पिकांचे मोठे नुकसान झाल्याचेही निदर्शनास आले आहे.
दुष्काळाची झळ बसलेल्या शेतकऱ्याला मदतीपासून वंचित ठेवू नये, या भूमिकेतून आमदार सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.
या सहा तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करून पीक नुकसानीचे पंचनामे, दुष्काळी सवलती व शासनाच्या विविध उपाययोजनांचा लाभ संबंधित शेतकऱ्यांना तातडीने देण्यात यावा, अशी मागणी आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे.











































































